पुणे : शहरातील सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या 'हॉट स्पॉट' भागातील रुग्ण संख्या नियंत्रित करण्याकरिता महापालिकेने 'रेमिडी' शोधून काढली असून या भागातील तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे. जवळच्या पालिकेच्या शाळा, मंगल कार्यालये आणि वसतिगृहांमध्ये जवळपास 72 हजार कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.शहरातील कोरोना रुग्ण संख्या एक हजाराच्या घरात पोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, कसबा-विश्रामबाग, शिवाजीनगर-घोले रस्ता आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास ७० टक्के रुग्ण याच भागातील आहेत. यातील बहुतांश भाग हा झोपडपट्टीबहुल असून अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे. त्यामुळे सामाजिक संक्रमणाचा धोकाही वाढला आहे. हा धोका अधिक वाढू नये याकरिता येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका आड एक अशी कुटुंब स्थलांतरित केली जाणार आहेत.महापालिकेने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पालिकेच्या आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणांना भेट देत व्यवस्था करण्यात आलेल्या शाळा, वसतिगृह आणि मंगल कार्यालयांची पाहणी केली. यासोबतच एसआरएच्या रिकाम्या इमारतींमध्ये काही कुटुंब हलविली जाऊ शकतात का याचाही अंदाज घेतला जात आहे.महापालिकेने ७२ हजार कुटुंबे स्थलांतर करण्याचे नियोजन केले असून टप्प्याटप्प्याने या शाळांमध्ये ही कुटुंब १५ ते २० दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहेत. सामाजिक संसगार्चा धोका टाळण्याकरिता दाटीवाटी कमी करण्याचा विचार यामागे आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २५ हजार कुटुंबे स्थलांतरीत केली जाण्याची शक्यता असून या शाळांची शनिवार-रविवार अशा दोन दिवसात स्वच्छता करण्यात आली असून याबाबतचे आदेशही काढण्यात आल्याचे आयुक्त गायकवाड यांनी संगीतले. शाळांमध्ये आणि मंगल कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर, खासगी वसतिगृहे ताब्यात घेण्याची तयारी पालिकेने चालविली आहे. या शाळा, मंगल कार्यालये आणि वसतिगृहांमध्ये ठेवण्यात येणा?्या नागरिकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून जेवण, न्याहारी पोचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
कोरोना 'हॉट स्पॉट'च्या नियंत्रणासाठी पुणे महापालिकेची नवीन‘रेमिडी’; साडेतीन लाख नागरिकांना हलविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 7:17 PM
पालिकेच्या शाळा, मंगल कार्यालये आणि वसतिगृहांमध्ये जवळपास 72 हजार कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केले जाणार
ठळक मुद्देदाटीवाटीच्या भागात केली जाणार उपाययोजना