पुणे : महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधी रुपयांची तरतुद करुन देखील केवळ निविदा प्रक्रिया वेळेत न राबविल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी यंदा काढली नाही. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला असून मोठ्या प्रमाणात पाणी मुठा नदीच्या पात्रात येत आहे. परंतु, यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील पाण्यासोबत वाहून येत असून, ही वाहून आलेले जलपर्णी ओंकारेश्वर मंदिर घाट परिसरामध्ये छोट्या पुलामुळे अडली आहे. परंतु यामुळे मुठा नदीच्या प्रवाहालाच अडथळा निर्माण झाला असून, भविष्यात मोठा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यात या जलपर्णीमुळे संपूर्ण शहरामध्ये डासांच्या साम्राज्यात वाढ झाली असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी शहरातील सर्व ओढे-नाले, मुळा-मुठा नदीतील जलवर्णी काढण्यात येते. परंतु यंदा जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व मशनिरी पुरवण्याचे संपूर्ण बजेट मोटार वाहन विभागाला देण्यात आले आहे. परंतु जलपर्णी काढण्यासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत राबविण्यात आली नाही. यामुळे तब्बल पावणेचार कोटी रुपयांची तरतुद करुन देखील यंदाचा पावसाळा जलपर्णी न काढल्याने पुणेकरांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये प्रसिध्द केले होते. याचा प्रत्यय पुणेकरांना आला असून, मुठा नदीच्या ओंकारेश्वर मंदिर येथील घाटालगत प्रचंड मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आहे. यामुळे नदीचा प्रवाहलाच अडथळा निर्माण झाल्याने, उशीरा जाग आलेल्या प्रशासनाने तातडीने तीन-चार मशीन लावून भर पावसात जलपर्णी काढण्याचे काम सुरु केले आहे. ---ही जलपर्णी काढतानही महापालिकेचा ‘अविवेक’पावसाळ््यापूर्वी महापालिकेने शहरातील ओढे-नाले आणि नदी पात्रातील जलपर्णी न काढल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब वाहत असून, नदी मुठा नदी पात्राच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. परंतु या पाण्यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी वाहून आली असून, महापालिकेच्या मुख्य इमारतीलगत असलेल्या ओंकारेश्वर घाट येथेली छोट्यापूलाला अडकून अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाकडून तातडीने भर पावसामध्ये तीन-चार मशीन लावून जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. परंतु ही जलपर्णी काढताना देखील काम चालाव पणा सुरु असून, अविवेक पध्दतीने नदी पात्राच्या बाहेर न काढता पुन्हा नदी पात्रामध्येच पुलाच्या पुढील बाजून टाकण्यात येत आहे. यामुळे पुन्हा मुठा नदीमध्ये पुढे कुठे तरी ही जलपर्णी वाहून जाऊन पुढील असणारी गावांमध्ये पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.
पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 1:26 PM
निविदा प्रक्रिया वेळेत न राबविल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी यंदा काढली गेली नाही.
ठळक मुद्देजलपर्णीमुळे मुठा नदीच्या प्रवाहाला अडथळा पुराचा धोका वाढणार ; जलपर्णीमुळे डासांच्या साम्राज्यातही वाढ