पुणे : एकीकडे केंद्र सरकारने १८ वर्षांवरच्या सर्वांना सरसकट लसीकरण खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र पुणे महापालिकेवर कोणी लस देत का लस अशी मागणी करत फिरण्याची आत्ताच वेळ आली आहे.आत्ताच पुरेसा साठा मिळत नसेल तर सरसकट लसीकरण करणार कसं असा प्रश्न महापालिकेचा अधिकाऱ्यांना पडला आहे. गेले काही दिवस सातत्याने महापालिकेला लसींचा तोकड्या साठ्या मध्ये काम चालवावे लागत आहे.
पुणे महापालिकेला जास्त लसी मिळणार अशी घोषणा महापौरांनी केल्यानंतर देखील यात काहीच बदल झालेला नाहीये. गेल्या शनिवारी साथ संपत आल्यावर महापालिकेला फक्त ३५००० लसी मिळाल्या आहेत. यापूर्वी देखील कमी अधिक फरकाने अशीच परिस्थिती कायम राहिली आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवायची वेळ आली तरी देखील ही परिस्थिती फारशी बदलायला तयार नाही.
शनिवारी आलेल्या लसींपैकी मंगळवारसाठी फक्त २२,००० डोसेस शिल्लक आहेत. महापालिका हद्दीमध्ये दर दिवशी साधारण १७,००० ते ३१ हजारांचा मध्ये लसीकरण केले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. या परिस्थती मध्ये नेमकी कशी लसीकरणाची आकडेवारी वाढवायची आणि मागणी आणि पुरवठा याचा मेळ कसा साधायचा असा प्रश्न अधिकारी विचारात आहेत.