पुणे : महापालिकेने कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. या कामासाठी पथके नेण्यात आले असून त्याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवर देण्यात आले आहे. शहरात सर्वेक्षणाचे काम अडचणीचे झाले असतानाच या डॉक्टरांच्या डोक्यावर समशानभूमीमधील कामाची जबाबदारी लादण्यात आली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम करायचे की स्मशानभूमीकडे लक्ष द्यायचे असा प्रश्न या डॉक्टरांपुढे पडला आहे.
पुणे पालिकेची विविध पथके शहराच्या विविध भागात जाऊन सर्वेक्षणाचे काम करीत झोपडपट्टीत, वस्त्या, मोहल्ले, चाळी, सोसायट्यामध्ये जाऊन घरातील कोणाला सर्दी, खोकला, ताप आणि कोरनासदृश लक्षणे आहेत किंवा नाहीत याची माहिती घेतली जात आहे. पुण्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने उपलब्द मनुष्यबळ मुळातच कमी आहे. ताण सहन करीत महापालिकेचे डॉक्टर्स आणि कर्मचारी हे काम करीत आहेत. आता त्यांच्यावर एक नवीन जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाबधित रुग्णांचे तीन मृत्यू झाले आहेत. कोरोना विषाणू बाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर दफनविधी केल्या जाणाऱ्या स्मशानभूमीत करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निदेर्शांचे पालन करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दफनविधी केला जावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. दफनविधीला पाच नातेवाईक, पाच कर्मचारीच उपस्थित असावेत. त्यांना महापालिकेकडून सुरक्षा साहित्य पुरविण्यात येणार असून त्याचा वापर केवळ कोरोना बाधित व्यक्तीच्या दफनविधीसाठीच करावयाचा आहे. मार्गदर्शक सूचनांचे आवश्यक त्या भाषेत भाषांतर करून दफनभूमीच्या दर्शनी भागात फलक लावणे, वापरलेले मास्क, ग्लोव्हजची विल्हेवाट लावणे अशी कामे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. त्यामुळे हे अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत.