pmc| पुणे महापालिका निवडणूक: कोणाच्या बाहुत किती आहे बळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:03 PM2022-02-04T16:03:30+5:302022-02-04T16:07:11+5:30
आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा...
राजू इनामदार
पुणे : खूप मोठा प्रभाग, ५५ ते ६७ हजार इतकी मतदार संख्या व तीनचा प्रभाग असल्याने नगरसेवक निवडणुकीत मोठी स्पर्धा व प्रचाराला अवघा महिना-दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. या परिस्थितीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. विद्यमान सत्ताधारी असणाऱ्या भाजपची चाल कशी असेल? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडी करून लढणार की स्वतंत्र? महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी काय करणार? अशा अनेक प्रश्नांची चर्चा शहरात सुरू झाली आहे. सध्या या पक्षांची स्थिती कशी आहे, त्यांना कशाचा फायदा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो हे गणित या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा.
भारतीय जनता पक्ष
फायद्याच्या गोष्टी
- बलशाली पक्षसंघटना परिवारातील संघटनांची जोड
- आधी राज्यातील व आता केंद्रातील सत्ता
- सत्तेच्या पाच वर्षांत नगरसेवकांनी केलेली स्थानिक विकासकामे
- आरपीआयबरोबरची युती
तोट्याच्या गोष्टी
- सत्ताकाळात उल्लेख करावा, असा एकही प्रकल्प पूर्णत्वाकडे नाही.
- तीनचा प्रभाग झाल्याने एकाला बसवावे लागणार.
- त्यातूनच बंडखोरी होण्याची दाट शक्यता
- पक्षातंर्गत कुरबुरी, गटबाजी विरोधकांकडून निविदांमधील घोटाळ्यांवर होणारी टीका.
- सध्याचे संख्याबळ - ९८ नगरसेवक, पूर्ण बहुमत
राष्ट्रवादी काँग्रेस
फायद्याच्या गोष्टी
महापालिकेत समाविष्ट गावांमधील वर्चस्व
स्वत:बरोबरचे उमेदवार निवडून आणण्याची ताकद
मतदारांवर सोयरेधायरे, पावणेरावळे यांचा प्रभाव
प्रभाव असलेले स्थानिक नेते मोठ्या संख्येने
नेत्यांवर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त
याने होऊ शकतो तोटा-
- दिग्गज गुंतणार स्वत:च्याच प्रभागात
- शहरावर प्रभाव टाकेल, असा नेता नाही
- पेठांमधील प्रभागांमध्ये नेते व कार्यकर्त्यांची वानवा
- नातेवाईकांचा पक्ष अशी होणारी टीका
- एकसंधतेचा अभाव
- सध्याचे संख्याबळ - ४१
काँग्रेस
फायद्याच्या गोष्टी
- तळागाळात पोहोचलेला राष्ट्रीय पक्ष
- शहरात अनेक ठिकाणी हक्काच्या मतपेढ्या
- विचारधारेत सर्वसमावेशकता
- शहराची माहिती असलेले स्थानिक नेते
याने होऊ शकतो तोटा
- क्षीण झालेली पक्ष संघटना
- महिला, युवक, विद्यार्थी अशा संलग्न संघटना निष्क्रीय
- राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरून मदतीचा अभाव
- नेत्यांमध्ये आलेली शिथिलता
- सध्याचे संख्याबळ - १०
शिवसेना
फायद्याच्या गोष्टी
- मुख्यमंत्रिपद असलेला राज्यातील सत्तेचा प्रमुख घटकपक्ष
- नेत्याच्या आदेशावर चालणाऱ्या युवकांची संख्या जास्त
- भाजपने फसवणूक केल्याची कार्यकर्त्यांची भावना तीव्र
- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव
- लढाऊ बाण्याचे कार्यकर्ते
याने होऊ शकतो तोटा
- शहरात सर्वदूर संघटनेचा अभाव
- स्थानिक प्रभावी नेतृत्वच नाही
- आर्थिकदृष्ट्या सक्षमता नाही
- राज्यस्तरीय मदतीपासून वंचित
- सध्याचे संख्याबळ- ९
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
फायद्याच्या गोष्टी
- पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा करिष्मा
- पक्षाची खळ्ळखट्याक प्रतिमा
- सुशिक्षित कार्यकर्त्यांची संख्या जास्त
- कल्पकता, नावीन्य व आकर्षक योजना
- गमावण्यासारखे काहीच नाही
याने होईल तोटा
- संघटनाबांधणीच नाही, मोजकेच कार्यकर्ते
- अचानक आंदोलन, अचानक माघार अशी पक्षाची प्रतिमा
- गंभीरपणे काम करणे, सातत्य ठेवणे याचा अभाव
- कोणताही ठोस कार्यक्रम नाही
- दुसऱ्या क्रमाकांची फळी वगैरे काहीच नाही
- सध्याचे संख्याबळ- २
आम आदमी पार्टी
फायद्याच्या गोष्टी
- कोरी पाटी, टीका होण्यासारखेच काहीच नाही
- संयमी विचारशील व कृतिशील कार्यकर्ते,
- दिल्ली राज्यातील सत्तेचा उपयोग
- भ्रष्टाचार वगैरे कसलेही आरोप नाहीत
- समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये चांगली प्रतिमा
याने होऊ शकतो तोटा
- शहरात सगळीकडे पक्षबांधणी नाही
- प्रभाव पडेल अशा स्थानिक नेतृत्वाचा अभाव
- आर्थिकृदृष्ट्या कमकुवत
- रचनात्मक असे कोणतेही काम नाही
- कार्यकर्त्यांचे संख्याबळ मर्यादित
- सध्याचे संख्याबळ- ०