लक्ष्मण मोरे
पुणे : शहरातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता या साथीला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिकेने शहर पोलिसांसोबत शहरात विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध आणि थुंकी बहाद्दरणविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. काही लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणे वागू लागले आहेत.गुरुवारी ( दि. १०) सकाळी आपल्या आलिशान मोटारीमधून चार मित्रांसह विनामास्क जात असलेल्या नांदेडचेआमदार अमरनाथ अनंतराव राजूरकर यांना पालिका - पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. या आमदाराकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आमदाराने बघून घेण्याची धमकी दिल्यानंतरही आपल्या कर्तव्यापासून हे कर्मचारी जराही विचलित झाले नाहीत.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरांमध्ये पोलिसांच्या मदतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंड वसुलीची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शहरात वीस हजारपेक्षा जास्त लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शास्त्रीनगर चौकामध्ये कारवाई करत होते. .गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आलिशान मोटारीमधून (एमच २६, बीआर ५९९९) चौघे विनामास्क जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु, वाहन चालकाने गाडी थांबली नाही. तो तसाच भरधाव पुढे निघाला. गाडीतील सर्व विनामास्क असल्याने पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी अडविली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला तुम्ही सर्व विनामास्क फिरत असल्याने दंडाची पावती करावी लागेल असे सांगितले. त्यावर चालकाने हुज्जत घालत गाडीमध्ये आमदार बसले आहेत; त्यांची तुम्ही पावती करणार का असा प्रश्न केला. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा नियम राज्य शासनाने केलेला असून सर्वसामान्य नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना नियम सारखेच आहेत असे सांगितले.
त्यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अरेरावीची भाषा करीत मी मास्क लावणार नाही तुला बघून घेतो अशा पद्धतीने धमकावयाला सुरुवात केली. पोलीस आणि पालिकेचे कर्मचारी नम्रपणे 'आपण आमदार आहात म्हणून आपणास कोरोना होणार नाही का? कोरोना कोणालाही होऊ शकतो. आपण मास्क लावला पाहिजे आपल्याला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याचे ते एक साधन आहे' असे समजण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमदारांनी मी मास्क लावणार नाही. मी तुम्हाला बघून घेईन अशा पद्धतीचे वक्तव्य केली. त्यांच्या धमकावणीमुळे तसूभरही न डगमगता पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी आमदार राजूरकर यांची पाचशे रुपयांची पावती केली. दंड भरल्यानंतरच त्यांची गाडी सोडण्यात आली. हा सगळा प्रकार रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक पहात होते. पालिकेच्या आणि पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले. प्रशासनाकडून सर्वसामान्यांवर होणारी कारवाई लोकप्रतिनिधींवर सुद्धा होऊ शकते याचा प्रत्यय आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.---------अमरनाथ राजूरकर हे नांदेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच नियम पायदळी तुडवायला सुरवात केली तर नागरिकांना प्रशासन कोणत्या तोंडाने सांगणार असा प्रश्न आहे.
...........
विधानसभा सभापतींकडे करणार तक्रारआम्ही मुंबईहून अधिवेशनावरून आलो होतो. नांदेडला निघालो होतो. गाडीत नियमाप्रमाणे तीनच व्यक्ती होते. आमच्या गळ्यात मास्क होते पण ते तोंडाला लावलेले नव्हते. पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केली. गाडीला काठी मारली. आम्ही वाद नको म्हणून रीतसर नियमाप्रमाणे पावती केली आहे. परंतु, आम्हाला चुकीची वागणुल देण्यात आली. या प्रकरणाची विधानसभा सभापतींकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे.- अमरनाथ राजूरकर, आमदार, नांदेड