पुणे : महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणा-या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या नॅशनल मेडिकल कमिशनची (एनएमसी) मान्यता लवकरच मिळेल. ही मान्यता मिळण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वास केंद्रिय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शिष्टमंडळाला दिले. मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातच प्रवेश देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा समावेश होता.
महापौर मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची संकल्पना मांडली होती. पालिकेने त्याकरिता निधी उपलब्ध दिला होता. पालिकेने महाविद्यालयाचा आराखडा तयार केला होता. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि मान्यता मिळाल्या आहेत. तसेच आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. अंतिम मंजुरीसाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने मोहोळ, बीडकर, रासने यांनी हर्षवर्धन यांची भेट घेऊन महाविद्यालयासंदर्भात चर्चा केली. तसेच मान्यतेसंदर्भात मदत करण्याची विनंती केली. वैद्यकीय महाविद्यालयाबाबत झालेल्या तांत्रिक पूर्ततांची माहिती आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुरेश चंद्र शर्मा यांचीही भेट घेण्यात आली. ====वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यातील शेवटचा टप्पा महत्वाचा आहे. विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. शहराची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी हे महाविद्यालय मैलाचा दगड ठरणार आहे. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आरोग्य मंत्र्यांकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे.- मुरलीधर मोहोळ, महापौर