लक्ष्मण मोरे - पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिका विविध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाय करीत असतानाच काही विशिष्ट नागरिकांकडून असहकार पुकारला जात आहे. महापालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता १३० पेक्षा अधिक पथके तयार केली आहेत. सर्वेक्षणाकरिता जात असलेल्या या पथकांना शहराच्या काही भागांमधून नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. तुम्ही एनआरसी-सीएए साठीच सर्वेक्षण करीत असल्याचा आरोप करीत या कर्मचाऱ्यांना परत पाठविण्यात आले.
शहरातल्या विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये घडलेल्या या प्रकारांमुळे कोरोना विरुद्धच्या लढ्याला खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आला. त्यानंतर गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या ४० वर जाऊन पोहोचली आहे. तर, शेकडो संशयितांचे वैद्यकीय नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. शहरात आवश्यक ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी केली जात आहे. जवळपास पाच लाख पत्रकांद्वारे जनजागृती करण्यात आली असून पोस्टर्स, सोशल मीडिया आणि होर्डींगद्वारे जनजागृती सुरु करण्यात आली आहे. पालिकेने विदेशात प्रवास करुन आलेल्या आणि काही लक्षणे दिसत असलेल्या जवळपास अडीच हजार नागरिकांना होम क्वारंटाईनकरुन ठेवले आहे. त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे.नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना कुटुंबातील कोणाला सर्दी, खोकला,ताप आहे का याची माहिती घेतली जात आहे.या पथकांतील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय साधने, मास्क, हातमोजे,सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनेही पुरविण्यात आली आहेत. हे नागरिकदररोज शहरातील नागरिकांच्या घरीजाऊन हे सर्वेक्षण करीत आहेत.लक्षणे असलेल्यांची माहिती आरोग्य विभागाला दिली जात असून आवश्यकता भासल्यास उपचार अथवा क्वारंटाईन करण्याचा सल्ला दिला जात आहे...............अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारलाशहरातील मध्यवर्ती पेठा, उपनगरांसह सर्व परिसरात सर्वेक्षणाचे हे काम सुरु आहे. परंतु, काही ठराविक मोहल्ल्यांमध्ये आणि लोकवस्तीमध्ये या पथकांना प्रवेश नाकारला गेला. या सर्वेक्षणाच्या आडून एनआरसी आणि सीएएचे सर्वेक्षण केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
सर्वेक्षण करणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रीकरणही करण्यात आले. परंतु, आजाराची लक्षणे देताना नाव देणे बंधनकारक का करता, असा प्रश्न करुन सर्वेक्षण करणाऱ्या महिलांना पिटाळून लावण्यात आले. एनआरसी आणि सीएएच्या सर्वेक्षणाची शंका मनात धरुन पुकारला जाणारा असहकार समाजाच्या असल्याने त्याबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता यामुळे निर्माण झाली आहे.