पुणे : पुणेकरांच्या सोयीसुविधांचा सर्व अंगांनी विचार करून हे अंदाजपत्रक तयार केले आहे. गणेशोत्सवाचा कार्यकर्ता, बँकेचा अध्यक्ष, स्थायीचा सदस्य आणि आता स्थायी समिती अध्यक्ष, हा प्रवास करताना आलेल्या अनुभवांमधून हे अंदाजपत्रक तयार केले आहे. निश्चितच ठरवून घेतलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून वाहतूक, महसूलवाढीसह महत्त्वाच्या विषयांवर काम करणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मुख्य सभेला दिला. पालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहामध्ये सोमवारपासून स्थायी समितीच्या अंदाजपत्रकावर चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये ५० पेक्षा अधिक नगरसेवकांनी त्यांची मते मांडली. बुधवारी पक्षनेत्यांच्या भाषणानंतर सभागृहनेते, उपमहापौर आणि स्थायी अध्यक्ष रासने यांची भाषणे झाली. त्यानंतर हे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. .........पाणीपुरवठा, नदी सुधारणा, मैलापाणी शुद्धीकरण, वाहतूक, आरोग्य आदी योजनांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. सर्वांचा विचार केलेला हा अर्थसंकल्प आहे. स्थायी समितीने सर्व घटकांना न्याय देण्याचा आणि शहराच्या विकासाचा विचार केल्याचे या अंदाजपत्रकामधून जाणवते. - उपमहापौर सरस्वती शेंडगे
फुगविलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कशी होणार? योजनांच्या घोषणा केल्या पण त्या पूर्ण कशा करणार? गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात ५० टक्के निधीही खर्च झालेला नाही. उत्पन्नाबाबत वर्तविण्यात आलेले अंदाज अवास्तवदर्शी आहेत. गुंठेवारी पद्धत आणल्यास उत्पन्नात वाढ होईल. समाविष्ट गावांचा विकास आराखडा होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी आणि स्मार्ट व्हिलेज ही नुसतीच गोंडस नावे आहेत. वाहतूककोंडीवर ठोस उपाय व निधी नाही. विरोधी पक्षाच्या सदस्यांना निधी देताना दुजाभाव करण्यात आला आहे. - दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या............सर्वसामान्य पुणेकरांना डोळ्यासमोर ठेवून सादर केलेले अंदाजपत्रक आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसे कसे येतील, योजनांचा भार पालिकेवर पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक, बस खरेदीबाबत तरतूद करून शहराच्या महत्त्वाच्या वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून देण्यात आले आहे. आरोग्याच्यादृष्टीनेही महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी शस्त्रक्रिया रुग्णालय, नानाजी देशमुख सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी रुग्णालय आदी महत्त्वपूर्ण योजना आणण्यात आल्या आहेत. परवडणारी घरे, पाणी या विषयांना न्याय देण्यात आला आहे. - धीरज घाटे, सभागृहनेता.................एखादे मोठे काम सुरू असताना थोडा त्रास होणारच मेट्रो, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना आदी मोठी कामे केवळ कागदावरच नाहीत, तर या कामांची कार्यवाही चालू आहे़ एखादे मोठे काम सुरू असताना वेळ लागतो व त्याचा थोडा त्रास सहन करावा लागतो़ मात्र, याच विकासकामांमुळे पुणे शहराचा भविष्यातील चेहरामोहरा बदलणार असून, या कामांचे कौतुकच पुढे होणार आहे़, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना केले़ अर्थसंकल्पात शहरी गरीब योजना, पंतप्रधान आवास योजना, योगा केंद्र, ११ गावांच्या विकासकामांसाठीच्या भरीव तरतुदीबाबत त्यांनी रासने यांचे कौतुक केले़ - श्रीनाथ भिमाले............मिळकत कराकरिता एका महिन्यासाठी अभय योजना आणा महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी होर्डिंग पॉलिसी आणावी़ तसेच, थकीत मिळकत करवसुलीसाठी एक महिना का होईना अभय योजना आणावी़, असे मत स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर यांनी व्यक्त केले़ महापालिकेच्या शाळांमधील दीड लाख विद्यार्थिसंख्या आजमितीला ५० हजारांवर आली आहे़ शिक्षण विभागाची ही दुरवस्था टाळण्यासाठी शिक्षण मंडळाची स्थापना करावी, असेही त्यांनी सांगितले़ - अजित दरेकर...................