पुणे :पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा पुणे - नाशिकरेल्वे प्रकल्प (pune nashik railway) नवीन वर्षांत सुसाट वेगाने धावणार असल्याचे स्पष्ट झाले. एका वर्षांच्या आत जमिनीची मोजणी पूर्ण करून खरेदी खत देखील सुरू करत जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख व भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे यांनी विकास प्रकल्पांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हवेली तालुक्यातील पेरणे गावातील चंद्रकांत गंगाराम कोलते यांना रेडीरेकनरच्या तब्बल पाच पट मोबदला देत शुक्रवार (दि.7) रोजी पहिले खरेदी खत करण्यात आले.
नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गांसाठी पुणे जिल्ह्यातील 51 गावांमधील जमीन घेण्यात येणार आहे. यासाठी आठ महिन्यांत जागेची मोजणी पूर्ण करण्यात आली. यासाठी जमिनीचे दर निश्चितीची किचकट प्रक्रिया देखील एक-दीड महिन्यात पूर्ण करण्यात आली. पुणे नाशिक रेल्वेसाठी जमिन संपादनासाठी रेडीरेकनरच्या पाच पट व जमिनीवर असलेल्या बांधकाम, सिंचन योजना, झाडे, फळबागासाठी एकूण मूल्याच्या अडीच पट मोबदला देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणा-या पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. ऐवढेच नाही तर पुणे - नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार आहे. पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील 51 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. बहुतेक सर्व गावांमधील जमिन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.
हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभाग प्रचंड आग्रही आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे विभागाने महसूल विभागाल डेडलाईन घालून दिली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार रिंगरोड व पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी प्रचंडी आग्रही असून, दर महिन्याला दोन्ही प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी जागेची मोजणी वेळेत पूर्ण करण्यासाठी खास यंत्रणा राबवून विक्रमी वेळेत जमिन मोजणीचे काम पूर्ण केले.
पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग २३५ किलोमीटरचा असून, या अंतर्गत दोन मार्ग बनविण्यात येणार आहेत. तर ही रेल्वे २०० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावेल. पुण्यासह अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे जाईल. रेल्वेमार्गावर १८ बोगदे आणि ४१ उड्डाणपूल केले जाणार आहेत. या संपूर्ण कामासाठी तब्बल १५०० कोटीचा निधी लागणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुण्याचा खडतर आणि वेळखावू प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार आहे.
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे पुणे जिल्ह्यातील एकूण गावे : 51 - हवेली तालुक्यातील गावे : 12- खेड तालुक्यातील गावे : 21- आंबेगाव तालुक्यातील गावे : 10- जुन्नर तालुक्यातील गावे : 08
हवेली तालुक्यातील पेरणे गावापासून पैसे वाटप सुरू पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी हवेली तालुक्यातील 12 गावांमधील जमिन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जमिन मोजणीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करून जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जमिनीचे दर देखील निश्चित करण्यात आला. त्यानुसार या रेल्वे प्रकल्पासाठी शुक्रवारी पहिले खरेदी खत करून पैसे वाटप देखील सुरू करण्यात आले.- रोहिणी आखाडे, उपजिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी