लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार शनिवारी सकाळी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात केली जाणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरला आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा देणा-या आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे. शहरातील आठ केंद्रांवर प्रत्येकी १०० याप्रमाणे ८०० जणांना लस दिली जाणार आहे. पुण्याची एकूण आवश्यकता ९६ लाख लसींची असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालिकेकडून लसीकरणाच्या करण्यात आलेल्या तयारीबाबत मोहोळ यांनी माहिती दिली. उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल आदी अधिकारी उपस्थित होते. महापौर म्हणाले, राज्य शासनाने निवड केलेल्या चार सरकारी व चार खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. पालिकेकडे तब्बल ५५ हजार आरोग्य सेवकांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
यामध्ये सरकारी आरोग्य सेवकांची संख्या ११ हजार ५०० आहे. पालिकेकरिता कोरोना प्रतिबंधक लसीचे ४८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. यामुळे २२ हजार लाभार्थ्यांना दोन डोस देता येणार आहेत. पालिकेच्या हद्दीतील खासगी आणि शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लागणारी लस पुढील काही दिवसात शासनाकडून मिळणार आहे.
-------------------
पुण्याला हव्यात ९६ लाख लसी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना लसीचा साठा नारायण पेठेतील मुख्य लसीकरण कार्यालयामध्ये करण्यात आला आहे. येथूनच लस शीत साखळीमार्फत केंद्रांवर पोचणार आहे.
मिळालेल्या लसीची नोंदणी ‘ई-विन’ या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये केली जाणार आहे. प्रत्येक डोसचा जमाखर्च या प्रणालीमध्ये नोंदविला जाणार आहे. तसेच ‘को-विन’ या प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या नोंदी, लसीकरण नियोजन, लाभार्थ्यांना मोबाईल मेसेज दिले जाणार आहेत.
शहराची लोकसंख्या ४४ लाख असून प्रत्येक नागरिकास दोन डोस याप्रमाणे ९६ लाख डोसची आवश्यकता आहे. याकरीता १०० केंद्र आणि ५०० बूथचे नियोजन केले जाणार आहे. या १०० केंद्रांच्या जागेची निवड करण्यात आलेली आहे.
येथे टोचली जाणार लस
1. कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसुतीगृह, कोथरुड
2. कमला नेहरु रुग्णालय, सोमवार पेठ
3. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
4. ससून सर्वोचपचार रुग्णालय
5. रुबी हॉल क्लिनिक, नगर रस्ता
6. नोबल हॉस्पिटल, हडपसर
7. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
8. भारती हॉस्पिटल, कात्रज
चौकट
यांना मिळणार लस
लसीकरणाचा प्राधान्यक्रम
१. वैद्यकीय सेवा देणारे सेवक
२. अत्यावश्यक सेवा देणारे सेवक (उदा. पोलीस, पालिका, शासकीय यंत्रणा आदी)
३. ५० वर्षांवरील व्यक्ती व व्याधीग्रस्त
४. सर्वसामान्य निरोगी व्यक्ती
चौकट
* नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच मिळणार लस
* लसीकरण केंद्रावर कोणतीही नोंदणी होणार नाही.
* नागरिकांनी केंद्रांवर गर्दी करु नये.