पुणे : ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची देशात वेगळी ओळख आहे. गेल्या तीन वर्षात ही ओळख आणखी दृढ झाली असून माहिती-तंत्रज्ञान आणि आॅटोमोबाईलचे देशातील प्रमुख केंद्र्र म्हणूनही जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. तसेच राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ म्हणून विकसित होत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या ध्वजारोहणानंतर बापट बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस सह आयुक्त रवींद्र कदम, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, न्यायमूर्ती, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांची माहिती देताना बापट म्हणाले, की शहराच्या विकासासाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमीटेड’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन, समान पाणीपुरवठा आणि स्मार्ट मिटरींग, झोपडपट्टी पुनर्विकास, स्मार्ट रस्ते, फुटपाथ, लाईट हाऊस, सेंट्रल कमांड कंट्रोल सेंटर, कॉमन मोबिलिटी कार्ड, सार्वजनिक वाहतुकीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती होणार आहे. यासर्व कामांना सुरुवात झाली असून या योजनेमुळे पुणे शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती सांगून बापट यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली.बापट यांनी परेडचे निरीक्षण करुन मानवंदना स्वीकारली. पथ संचलनात राज्य राखीव पोलीस दल, महिला पोलीस पथक, पुणे ग्रामीण, पुणे शहर यांच्या जवानांनी भाग घेतला. तसेच सामाजिक वनीकरण, सामाजिक न्याय विभाग, सर्व शिक्षा अभियान, जलयुक्त शिवार अभियान, पुणे मनपा, स्वच्छ भारत मिशन यांचे चित्ररथ सहभागी झाले होते.दरम्यान, बापट यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक विजेते, जिल्हा क्रीडा पुरस्कार, गुणवंत क्रीडा शिक्षक, गुणवंत क्रीडा संघटक, राष्ट्रीय हरित सेना पंचतारांकित शाळा आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ : गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 12:56 PM
राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ म्हणून विकसित होत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
ठळक मुद्दे'शहराच्या विकासासाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमीटेड’ कंपनीची स्थापना'विविध योजनांमुळे पुणे शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे : गिरीश बापट