सांगवी - अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने म्हातारपणी अंथरुणावरच जगण्याचा संघर्ष करण्याचे भोग त्यांच्या नशिबी आले. पण, या संघर्षाला समाजसेवाची सोनेरी किनार देत त्यांनी सत्तरीतही विवाहाच्या रेशीमगाठी जुळविण्याचा ध्यास सोडला नाही. आतापर्यंत त्यांनी ५९ संसार उभे केले. पोटाची खळगी भरण्यासाठी याच रेशीमगाठी त्यांचा आधार बनला आहे.दत्तात्रेय आपुणे असे त्यांचे नाव. बारामती येथे गेली नऊ वर्षांपासून ७० व्या वयातही सर्व जाती धर्मांच्या विवाहाच्या रेशीमगाठी जुळवत आहेत. त्यांची पत्नी सुनीता या त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. विवाह जुळविण्यातून चार पैसे मिळवून ९ वर्षांपासून लढा कायम तेवत ठेवला आहे.बारामती येथील एका खासगी कंपनी मध्ये आपुणे काम करून दोघे दाम्पत्याचा उदरनिर्वाह सुरू होता. नऊ वर्षा पूर्वी ते ठाणे येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. रस्त्याने चालत असताना पाठीमागील बाजूने दुचाकीस्वराने दिलेल्या जोरदार धडकेने मणक्याला जबर मार लागून त्यांना कायम स्वरुपी अपंगत्व आले. त्यांना ना बसता ना उठता येते. एका जागेवर झोपुनच त्यांचा दिवस उजाडतो व मावळतोही.आपुणे यांचा जगण्याचा संघर्ष पाहून नोकरदार विकास निकम, रफिक तांबोळी, तानाजी भोसले, प्रकाश पवार यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. दर महिन्याला औषधोपचारासाठी त्यांना मदत करणार असल्याचे निकम यांनी सांगितले.वीरशैव मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस भाड्याच्या घरात दोघेच आपुणे दाम्पत्य राहण्यास असून घरातच वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून मिळेल त्या पैशात समाधानी असतात. त्यांच्याकडे विवाहासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपयार्तुन बायोडाटा येऊन पडले आहेत. या परिस्थितीतही ते न विसरता काळजीपूर्वक दुरध्वनीद्वारे स्थळे सांगण्याचे काम न विसरता करत आहेत. आज पर्यंत त्यांनी ५९ विवाह जुळवून जोडप्याला विवाहाच्या बंधनात अडकून देऊन त्यांच्या जीवनात सुखसमाधानाने नांदत आहेत.
रेशीमगाठींसाठी दिव्यांगाची सेवा, वयाच्या सत्तरीतही सुरू आहे ध्यासपूर्ण कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 1:49 AM