पुणे : केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर धान्यवाटप करताना राज्याला अंत्योदय योजनेचे शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थी यांची संख्या निश्चित केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अंत्योदय योजनेसाठी एकूण शिधापत्रिकांच्या संख्येत कोणताही बदल केलेला नसला तरी प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे ६ लाखांनी वाढ झाली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यांना मंजूर केलेल्या शिधापत्रिकांना या धान्यवाटपात समाविष्ट करून घेता येणार आहे. यात काही जिल्ह्यांच्या शिधापत्रिका आणि लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ, तर काही जिल्ह्यांत घट झाली आहे.
राज्य सरकारने अनेकदा निरनिराळ्या पद्धतीने धान्याच्या कोट्यात बदल करून देखील कोटा पूर्णपणे वितरित होत नसल्याचे दिसून आले आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर डिजिटायझेशन करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या संख्येनुसार विनावापर कोटा शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवरील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या आधारे जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून अंमलबजावणी सुरू आहे. शिधापत्रिकाधारकांकडून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न व प्रत्येक सदस्यांचा आधार क्रमांक यासह कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती दर्शविणारे सुधारित हमीपत्र देखील भरून घेण्यात येत आहे.
राज्यासाठी दिलेल्या एकूण कोट्याची पूर्तता होत नसल्याने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर डिजिटायझेशन करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या आधारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या कोट्यानुसार राज्यात २५ लाख ५ हजार ३० अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका निश्चित करण्यात आल्या आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत ५ कोटी ९८ लाख १२ हजार ७९६ इतकी आहे. गेल्या वर्षी अंत्योदय योजनेची संख्या कायम होती. तर प्राधान्य योजनेत ५ कोटी ९२ लाख १६ हजार ३१ लाभार्थी होते. यंदा त्यात ५ लाख ९६ हजार ७६५ लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली आहे.
पुणे जिह्यातील अंत्योदय योजनेसाठी ९ हजार १०० पत्रिकांची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने ३१६ पत्रिका वाढवून दिल्या आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत सुमारे अडीच लाख लाभार्थी वाढवून मिळावेत अशी मागणी होती. प्रत्यक्षात ४८ हजार २४१ लाभार्थी संख्या वाढवून मिळाली आहे. ही वाढीव संख्या समप्रमाणात १३ तालुक्यांना विभागून देण्यात येईल. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारीपुणे शहरात अंत्योदय योजनेसाठी ५०० पत्रिकांची मागणी असताना ४५ ची वाढ आहे, तर प्राधान्य योजनेत ५ लाख लाभार्थ्यांची वाढीव मागणी करण्यात आली होती. त्यात केवळ २८ हजार ८९६ लाभार्थ्यांची वाढ देण्यात आली आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणेे शहर