आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा
By राजू इनामदार | Updated: March 22, 2025 20:08 IST2025-03-22T20:06:39+5:302025-03-22T20:08:34+5:30
एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे.

आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) आमची भेट झाली. मात्र त्यात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (आर्टिफिशल इंटलिजेन्स) वापरासंबधी चर्चा झाली. तिथे अन्य काही जणही उपस्थित होते. राजकीय काहीही नव्हते, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या व्हीएसआयमधील भेटीबद्दल केला. उगीच काहीही बातम्या पसरवू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिला.
व्हीएसआयमध्ये शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी अजित पवार यांची बंद दालनात भेट घेतली. पाटील शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे ही भेट समाजमाध्यमांवर व्हायरल झाली.
अजित पवार यांनी त्यामुळेच तिथून निघताना पत्रकारांसमोर खुलासा केला. ते म्हणाले, एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे. हा महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळेच अंदाजपत्रकात मी यासाठी ५०० कोटी रूपयांची स्वतंत्र तरतुद केली आहे. वापरासंबधी काय करता येईल यावर विचार करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. जयंत पाटील या समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे ते चर्चेसाठी म्हणून आले होते. त्यामुळे या भेटीत राजकीय काहीही नाही.
औरंगजेबाचा वाद वारंवार उकरून काढला जातो आहे. या विषयीही पवार यांनी थेट नाव न घेता भाजपचे मंत्री निलेश राणे यांच्याविषयी संताप व्यक्त केला. जबाबदार पदांवर काम करणाऱ्या माझ्यासह सर्वांनीच बोलताना भान ठेवायला हवे. माझे मंत्री असतील तर मी त्यांना सांगतो. अन्य कोणाचे मंत्री असे काही प्रक्षोभक बोलत असतील तर त्यांच्या नेत्यांना सांगू, महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी असे पवार म्हणाले.