पुणे : वाहतूककोंडीचे शहर म्हणून जगाच्या नकाशावर झळकलेल्या पुण्यात मागील काही दिवसांत कमालीचे बदल घडत आहेत. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग १०.४४ टक्क्यांनी वाढला असल्याचे वाहतूक पाेलिस सांगत आहेत. एटीएमएस तंत्रज्ञावरून ही बाब दिसून येते, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
शहरातील प्रत्येक व्यक्ती दररोज किमान १० किमीचा प्रवास करतो. ताे वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाला आहे. राेजच्या वाहतूककोंडीमुळे इंधनाचा अपव्यय तर हाेताेच, शिवाय पर्यावरणाची हानी हाेते. यामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून केला जात आहे. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या सूचनेनुसार वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्या रस्त्यांचा अभ्यास केला. त्यात ‘लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक्स’चा वापर करून काही उपाययोजना राबविल्या. त्यासाठी शहरातील २६५ किमी लांबीचे ३३ मुख्य रस्ते निश्चित केले आहेत.
या उपाययाेजनांवर दिला भर :
प्रामुख्याने वाहतूक अभियांत्रिकी बदल, तंत्रशुद्ध पद्धतीने व्हेईकल काऊंटच्या आधारे राईट टर्न, लेफ्ट टर्न, यू टर्न बंद अथवा सुरू करणे, बॉटलनेक दूर करणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे पीएमपी आणि खासगी बसथांबे, रिक्षाथांबे स्थलांतरित करणे, सिग्नल सिंक्रोनाइज करणे, सिग्नलचे टायमिंग व्यवस्थित करणे यासह अन्य काही उपाययोजना केल्या आहेत. यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण ५३ टक्के कमी झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण
शहरात पहिल्यांदाच वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ४४५ जणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ न देणे, जास्तीत जास्त वाहने गर्दीच्या वेळी पास करणे याबाबत त्यांना शिकवले जात आहे.
९९ सिग्नल सिंक्रोनाइज..
शहरात एकूण ३०२ सिग्नल आहेत. त्यातील १२४ सिग्नल हे एटीएमएस आहेत. त्यापैकी ३३ ठिकाणचे ९७ सिग्नल सिंक्रोनाइज केले असून, उर्वरित एटीएमएस स्वतंत्र सिग्नल २७ आहेत. १७६ जुन्या सिग्नलपैकी प्रायोगिक तत्त्वावर २ रिमोट कंट्रोल सिग्नल कार्यान्वित करण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष मोहिमेअंतर्गत गेल्यावर्षीच्या तुलनेत या कारवायांमध्ये पाच पट वाढ झाली असून, एकूण कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे.
आकडेवारी...
विशेष मोहीम - (ड्रंक अँड ड्राइव्ह, ट्रिपल सीट, राँग साइड, धोकादायक ड्रायव्हिंग, जड वाहतूक)
जानेवारी ते मार्च २०२४ - २०२५
२ लाख ३५ हजार २११ - ४ लाख ४५ हजार ८१६