पुणे : गुढीपाडव्याला आंब्यांना मागणी वाढते. यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा लागवड कमी प्रमाणावर झाली असून, नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक ३० टक्क्यांनी घटले असल्याने दरात वाढ झाली आहे. मागील वर्षी पाडव्याला ४ डझन आंब्याची पेटी २ अडीच ते ३ हजार रुपयांना मिळत होती. तीच आता ४ डझन पेटी साडेतीन हजार ते ४ हजार रुपयांवर गेली आहे. एक डझन हापूसचे दर ९०० ते १५०० रुपयांपर्यंत आहेत.तसचे मागील वर्षी आकाराने मोठा आंबा होता, तर यंदा लहान आकाराचे आंबे आहेत. गेल्या गुढीपाडव्याला ग्राहकांकडून आंब्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली गेली होती. यंदा आंब्यांची आवक अतिशय कमी प्रमाणावर झाली आहे, असे आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.यंदा आंबा हंगाम लवकरच संपणार यंदा आंब्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. १० एप्रिल ते १० मे या कालावधीत आंब्याची आवक वाढणार आहे. पुढील महिन्यात आंब्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी हापूसचा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असतो. यंदा पहिल्या बहरातील आंब्याच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आंब्याचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात आंब्यांची आवक वाढते. साधारणपणे कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक मार्केटयार्डातील फळबाजारात होते. सध्या बाजारात दररोज एक ते दोन हजारपेटी आंब्यांची आवक होत आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोकणात अपेक्षित थंडी पडली नाही. त्यामुळे मोहोर गळून पडल्याने आंबा लागवडीवर परिणाम झाला आहे. - युवराज काची, आंबा व्यापारी, श्रीछत्रपती शिवाजी मार्केटयार्ड