- किरण शिंदे
पुणे - पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही आज सकाळी एक भला मोठा कंटेनर राँग साईडने रस्त्यावर आल्याने नागरिकांसह वाहनचालक आश्चर्यचकीत झाले. कंटेनर रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. कंटेनर लक्ष्मी रस्त्यावर कसा पोहोचला? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
दरम्यान, पुण्यात मेट्रोचे काम सुरू असून, या कामासाठी लागणारे साहित्य घेऊन स्वारगेट परिसरात आलेला कंटेनर माल उतरवल्यानंतर शहराबाहेर जाण्यासाठी निघाला. मात्र, परप्रांतीय चालकाला रस्त्यांचा अंदाज न आल्याने तो चुकला आणि थेट लक्ष्मी रस्त्यावर पोहोचला.हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा झाला नाही. मात्र इतक्या मोठ्या कंटेनरला लक्ष्मी रस्त्यावर पाहून अनेक नागरिक अचंबित झाले. पोलिसांची तत्परता; कंटेनर हलवला याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि कंटेनर मोकळ्या जागी हलवून रस्ता मोकळा केला. हा कंटेनर योग्य मार्गावर वळवण्यात आला असून, पुढील गैरसोयी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे.