प्लॅन तयार ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा होणार कायाकल्प;छाननी, चर्चा करून करणार खांदेपालट

By राजू इनामदार | Updated: April 15, 2025 20:04 IST2025-04-15T20:00:24+5:302025-04-15T20:04:46+5:30

पक्षाला सक्रिय करण्याबरोबरच सपकाळ यांनी जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्याची मोहीमही सुरू केली आहे.

pune news Maharashtra Pradesh Congress will be rejuvenated; Will change its mind after scrutiny and discussion | प्लॅन तयार ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा होणार कायाकल्प;छाननी, चर्चा करून करणार खांदेपालट

प्लॅन तयार ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा होणार कायाकल्प;छाननी, चर्चा करून करणार खांदेपालट

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ नियुक्त केलेल्या निरीक्षकांचे जिल्हा व शहरनिहाय अहवाल प्रदेश काँग्रेसला प्राप्त झाले आहेत. आता या अहवालांची छाननी करून, तेथील संबंधितांबरोबर चर्चा करून त्या-त्या शहर व जिल्ह्यात खांदेपालट करण्यात येणार आहे. यामध्ये युवा कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्याचा व सक्रिय नसणाऱ्या ज्येष्ठांना मार्गदर्शक करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. निरीक्षकांना त्यादृष्टीनेही चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सलग तीन पंचवार्षिकमध्ये काही अपवाद वगळता सातत्याने पराभव पत्करावा लागल्याने राज्यातील काँग्रेसची राजकीय स्थिती नाजूक झाली आहे. त्यातही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सपाटून मार बसला. त्याची परिणीती प्रदेशाध्यक्ष बदलात झाली. माजी आमदार असलेले नवे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडून पक्षाला बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांनीही सूत्रे हातीच घेताच कामाला सुरुवात केली आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेल्या बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी मस्साजोग ते बीड अशी दोन दिवसांची सदभावना यात्रा काढली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दंगलग्रस्त नागपुरात ते अशीच यात्रा काढत आहेत. पक्षाला सक्रिय करण्याबरोबरच सपकाळ यांनी जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्याची मोहीमही सुरू केली आहे.
 

पक्षाचा चेहरा तरुण करण्याचा प्रयत्न

आता एकएक अहवाल मिळत आहेत. पक्षात ज्येष्ठ, अनुभवी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे स्थान नेहमीच महत्त्वाचे असते. त्यांच्याबरोबर चर्चा करून, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यात येईल. मात्र त्याचबरोबर पक्षाला एक नवी सळसळीत ओळख मिळावी असाही प्रयत्न आहे. वैचारिक बैठक पक्की असलेले, पक्षनिष्ठा ठेवणारे व प्रसंगी ती सिद्धही करणारे नवे पदाधिकारी पक्षाला देण्याचा विचार आहे. हा बदल काही लगेच होईल असे नाही, मात्र त्यादृष्टिने वाटचाल करण्याचा विचार आहे. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: pune news Maharashtra Pradesh Congress will be rejuvenated; Will change its mind after scrutiny and discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.