विवेक भुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असल्याने सध्या घरादारात त्याचीच चर्चा आहे. त्याचवेळी या वाढलेल्या बाजारभावामुळे काही शेतकर्यांनी कसे अल्पावधीत लाखो रुपये कमाविले, याच्या बातम्याही येत आहेत. अगदी बहुराष्ट्रीय कंपनी मॅकडोनाल्ड कंपनीलाही टोमॅटोच्या भावाने जेरीस आणले आहे. त्यामुळे त्यांनी टोमॅटोशिवाय बर्गर देण्याचा विचार सुरु केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यावेळी या टोमॅटोमुळे भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात हाणामारी होऊन जखमी करण्याचा प्रकार वडगाव शेरी भाजी मार्केटमध्ये घडला.
याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२, रा. गलांडेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी अनिल गायकवाड (रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाल ढेपे हे भाजी आणण्यासाठी वडगाव शेरी येथील भाजी मार्केटमध्ये गेले होते. त्यांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांनी टोमॅटोचा भाव विचारला. त्यांनी टोमॅटो २० रुपये पावशेर असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना खूप महाग आहेत, असे उत्तर दिले. त्यावरुन अनिल गायकवाड यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादीचे तोंडावर बुक्कीने मारहाण करुन वजनकाट्यातील वजन हातात घेऊन त्यांच्या उजव्या गालावर मारुन जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस हवालदार नांगरे तपास करीत आहेत.