फ्लेक्सवरून आमदार हेमंत रासने राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
By राजू इनामदार | Updated: March 21, 2025 15:45 IST2025-03-21T15:43:03+5:302025-03-21T15:45:32+5:30
पुणे : कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरून आमदार हेमंत रासने यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्य केले आहे. रासने यांनी आपण ...

फ्लेक्सवरून आमदार हेमंत रासने राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुणे : कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरून आमदार हेमंत रासने यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्य केले आहे. रासने यांनी आपण आपल्या मतदारसंघात कघीही फ्लेक्स लावणार नाही असे जाहीर केले होते. तुम्ही नाही लावणार, पण तुमचे अन्य पदाधिकारी लावतात, त्याचे काय करणार असा प्रश्न त्यांना राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे.
रासने यांच्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त कसब्यात सर्वत्र त्यांचे फ्लेक्स लागले आहेत, त्यावरूनच काकडे यांनी हा निशाणा साधला आहे. रासने यांनी फ्लेक्स लावणार नाही असे जाहीर केले त्याचवेळी त्यांचे स्वागत केले. आजच्या चमको च्या काळात असा निर्णय घेणे धाडसाचे असल्यानेच त्यांचे जाहीर स्वागत केले असे काकडे यांचे म्हणणे आहे.
मात्र त्याचवेळी आपण तुम्ही नाही लावणार तर आनंदच आहे, पण तुमचे कार्यकर्ते, पदाधिकारी लावतील त्याचे काय करणार? असा प्रश्न केला होता. आता त्यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष घाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रश्न पुढे आला आहे. कसब्यातच नव्हे तर पुण्यात अन्यत्रही घाटे यांना शुभेच्छा देणारी भलेमोठे फ्लेक्स लागले आहेत. त्याचा वाहतुकीला, वाहनधारकांना बाजूचे काही दिसणाऱ्या अडथळा होत आहे. त्याशिवाय डोळ्यासमोर अचानक असा भला मोठा फ्लेक्स आल्यानंतर वाहन चालवताना लक्ष विचलीत होते ते वेगळेच.
त्यामुळे हा प्रश्न रासने यांना विचारणे क्रमप्राप्त आहे असा खास पुणेरी बाणा काकडे यांनी याबाबतच समाजमाध्यमांवर पोस्ट व्हायरल करत दाखवला आहे. तुम्ही नाही लावणार पण तुमचे पदाधिकारी लावतात, त्याचे काय करणार? असा प्रश्न त्यांनी या पोस्टवर विचारला आहे.