- जयवंत गंधालेहडपसर : फुरसुंगी येथील भेकराई नगर येथे सासवड रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने त्याने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घातला. त्याला पकडून त्याची धिंड फुरसुंगी पोलिसांनी काढून पोलिसांवर हल्ला केल्यावर काय होईल. हे दाखवून दिले.या हल्ल्यात पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) गंभीर जखमी झाले होते. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती यानंतर व्हिडीओ वायरल झाला होता. ट्राफिक हवालदार यांना डोक्यात दगड घालून जखमी केलेला आरोपी आदिनाथ ऊर्फ बबलू भागवत मसाळ रा. कोलवडी, मुरकुटे वस्ती याला उस्मानाबाद येथून अटक करून भेकराई नगर येथून आज सायंकाळी वाजता धिंड काढण्यात आली.यावेळी फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे उपस्थित होत्या. पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी ते भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातून एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला पकडून पोलिसांनी काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 19:50 IST