हॉटेल नाही, नेत्यांचे घर नाही.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थेट काँग्रेसभवनातच येणार..! कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला
By राजू इनामदार | Updated: March 21, 2025 19:00 IST2025-03-21T18:58:25+5:302025-03-21T19:00:16+5:30
पक्षाच्या शहर शाखेत असणाऱ्या वेगवेगळ्या गटांमध्ये प्रदेशाध्यक्षांसमोर कसे राहता येईल यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.

हॉटेल नाही, नेत्यांचे घर नाही.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थेट काँग्रेसभवनातच येणार..! कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला
पुणे :काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यपदाची धुरा घेतल्यानंतर शनिवारी (दि.२२) प्रथमच पुणे शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या साधेपणाचे आकर्षण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असून खुद्द प्रदेशाध्यक्षांनाही अन्य कुठे कोणाच्या निवासस्थानी जाण्यापेक्षा दिवसभर काँग्रेसभवनवरच थांबणे पसंत केले आहे. पक्षाच्या शहर शाखेत असणाऱ्या वेगवेगळ्या गटांमध्ये प्रदेशाध्यक्षांसमोर कसे राहता येईल यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
सपकाळ मुंबईहून पुण्यात येतील. पंचतारांकित हॉटेल किंवा बड्या नेत्याचे निवासस्थान इथे थांबण्याऐवजी ते थेट काँग्रेसभवनमध्येच येणार आहेत. पत्रकार परिषद व त्यानंतर प्रमुख पदाधिकारी, नेते यांच्याबरोबर वार्तालाप, त्यानंतर सलगपणे पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड व पुणे शहर पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका असा त्यांचा कार्यक्रम त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला आहे. मधल्या काळात दुपारचे त्यांचे जेवणही काँग्रेसभवनमध्येच नियोजित करण्यात आले आहे. याआधीच्या बहुसंख्य प्रदेशाध्यक्षांच्या तुलनेत या साधेपणाचेच आकर्षण काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.
शहर शाखेत वेगवेगळे गट अस्तित्वात आहेत. जिल्हा व पिंपरी-चिंचवड शहर हेही त्याला अपवाद नाहीत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे त्यांचे प्रकार कायम सतत सुरू असतात. त्यातही नेते आले की अशा गोष्टींना जोर येतो. आताही नव्या प्रदेशाध्यक्षांची मर्जी संपादन करण्यासाठी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातून व पिंपरी-चिंचवडमधूनही शनिवारी काँग्रेसभवनमध्ये नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत. प्रदेशाध्यक्षांचे स्वागत करण्याची अहमहिका त्यांच्यात सुरू आहे.
दरम्यान सपकाळ जिल्ह्यातील राजकीय स्थितीबाबत नेते, पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींबरोबर संवाद साधणार आहेत. त्यामध्ये पक्षाची हानी करणाऱ्या गोष्टी टाळाव्यात, पक्षाच्या ध्येयधोरणांशी विसंगत कार्यक्रम घेऊ नयेत, करू नयेत याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या बैठकांमध्ये ते आगामी निवडणुका, त्यांना कसे सामोरे जायचे, त्यासाठी कायकाय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळाली. हाच प्रमुख विषय ठेवून त्यांनी पुणे दौऱ्याचे नियोजन केले असल्याचे समजते.