पुणे :पुणे शहरासह राज्यातील रिक्षांच्या उजव्या बाजूला दरवाजा अथवा प्रवाशांना चढ-उतार करता येऊ नये, अशी व्यवस्था करणे हा नियम आहे. पुणे शहरातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त रिक्षांची उजवी बाजू बंद केली आहे. काही नवीन रिक्षांची उजवी बाजू बंद नाहीए, ती देखील लवकरच नियमानुसार बंद केली जाणार आहेत, असे काही रिक्षाचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शहरात ९० हजार रिक्षा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून ९० हजारांपेक्षा अधिक रिक्षा आहेत. यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक रिक्षांची उजवी बाजू बंद आहे. तसेच आरटीओ विभाग आणि पुणे शहर वाहतूक पोलीस देखील वेळोवेळी यासंबंधी सूचना देत असल्याने पोलिसांकडे याप्रकरणी एकाही रिक्षाचालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली असल्याची नोंद नाही.
पहिल्यांदा ५००, दुसऱ्यांदा दीड हजाराचा दंड...
मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षाच्या उजव्या बाजूचा दरवाजा बंद नसेल तर पहिल्यांदा पोलिसांनी पकडल्यावर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. पुन्हा ‘जैसे थे’ आढळल्यास दीड हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केलेली आहे. पोलीस अशा प्रकरणात शक्यतो दंडात्मक कारवाई न करता रिक्षाचालकाला नियमानुसार रिक्षा चालवण्याचे मार्गदर्शन करतात.
सहा महिन्यांत एकालाही दंड नाही..
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यात अशाप्रकारे एकाही रिक्षा चालकाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. सीएनजीच्या वाढलेल्या भावामुळे आधीच रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शक्यतो पोलिसांकडून दंडात्मक कारवाई ऐवजी समजावून सांगितले जात आहे.
रिक्षाचालक काय म्हणतात ?
रिक्षाचालकांनी या नियमाचे स्वागतच केले आहे. यामुळे रस्त्यात उजव्या बाजूने प्रवासी उतरू शकत नसल्याने अपघाताचा धोका टळतो, त्यामुळे आम्हाला यासंबंधी काहीही अडचण नाही. आम्ही सर्वच वाहतूक नियमांचे पालन करतो, त्याप्रमाणे या नियमाचे देखील पालन करतो, असे मत रिक्षाचालकांनी व्यक्त केले.