पुणे: केंद्र सरकारने मंजूर करून घेतलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जमीन घोटाळा आहे, देशातील सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचा प्रकार आहे अशी टीका आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनी केली. त्यांच्या राज्यात द्वेष व तिरस्कार याशिवाय काहीही मिळणार नाही असे ते म्हणाले.
दिल्लीला जात असणारे संजय सिंग मंगळवारी काहीवेळ पुण्यात थांबले होते. यावेळात त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची नाना पेठेतील पक्ष कार्यालयात बैठक घेतली. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुभार, कार्याध्यक्ष अजित फाटके यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजय सिंग यांनी भाजपला लक्ष्य करत त्यांच्यावर तोफ डागली.
ते म्हणाले, “दिल्लीतील जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्विकारला, मात्र आता दोन महिन्यातच दिल्लीकरांना पश्चाताप होतो आहे. आप च्या सरकारने दिलेल्या मोहल्ला क्लिनीक, विनामुल्य वीज, सर्वोत्कृष्ट शाळा, पाणी, रस्ते अशा सर्व गोष्टी या सरकारने बंद केल्या. त्यांना यातले काहीही करायचे नाही तर द्वेष, तिरस्कार यांची पेरणी करायची आहे. त्यांच्या राज्यात कुठेही विकास, वंचितांना न्याय मिळणार नाही तर द्वेष व तिरस्कारच फक्त मिळेल. महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला त्यांच्या सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली नाही. मात्र कश्मिर फाईल्स वगैरे त्यांचा पाठिंबा असलेल्या चित्रपटांना लगेचच परवानगी मिळते.”
वक्फ म्हणजे भाजपचा जमिनीचा घोटाळा आहे. त्यांनी मंदिरांची जमिनही सोडलेली नाही. काशीमध्ये त्यांनी ३०० पेक्षा जास्त मंदिरांची जमिन ताब्यात घेतली. अयोध्येतील संऱक्षण मंत्रालयाचा एक मोठा भुखंड त्यांनी अदानी उद्योगाला दिला असे अजय सिंग म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाबद्दल बोलताना अजय सिंग म्हणाले, “तुम्हाला औरंगजेबाची क्रुरता शिकवायची तर शिकवा, पण मग इंग्रजांनी केलेला क्रुरपणाही शिकवा. किमान त्यानिमित्ताने स्वातंत्ऱ्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेही नव्हता हे नव्या पिढीला समजेल. स्वातंत्ऱ्यानंतर कितीतरी वर्षे संघ मुख्यालयावर तिरंगा ध्वज लावला गेला नव्हता हेही कळेल.”