पुणे - पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. तनिषा भिसे यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी २० लाख रुपयांचा खर्च सांगितला आणि त्यातील १० लाख रुपये तातडीने भरण्याची अट घातली. कुटुंबीयांनी तत्काळ ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तसेच उर्वरित रक्कम काही वेळाने भरण्याचं आश्वासन दिलं. मात्र, रुग्णालयाने पूर्ण रक्कम भरण्याच्या मागणीवर ठाम राहत, आर्थिक ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जावं, असा सल्ला दिला. या घटनेनंतर नातेवाईकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते तर आज रुग्णालय समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.आज दीनानाथ रुग्णालयाने अहवाल सादर करत आपली बाजू मांडली आहे. या अहवालात २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयाची बदनामी करण्यात आल्याचा आरोपही रुग्णालयाने केला आहे. डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:24 IST