पुणे - पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ‘धनगरी नाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात तब्बल ५०,००० धनगरी ढोल वाजवणार आहे, महाराष्ट्रातील विविध भागांतील धनगर बांधव यात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र निमंत्रण दिलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे.पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हा कार्यक्रम सरकारचा नाही, धनगर समाजाचा आहे. समाजाच्या भावना आणि निर्णय यानुसारच कोणाला बोलवायचं हे ठरतं. त्यामुळे अजित पवार यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावेळी ‘फुले’ चित्रपटाविषयीही त्यांनी मत व्यक्त करताना राज्यात सध्या जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत सुरू झाली आहे. सत्ता गेली की नवीन इतिहासकार जन्माला येतात. यांच्यावर सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली.