लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात वाहतुकीची समस्या आहे. जागा अपुरी पडत आहे. वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यापासून सुटका हवी असेल, तर पुण्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉर असो अथवा अहमदनगर-कल्याण हा मार्ग असो आपल्याला येथे नवीन पुणे वसवायला हवे. तुम्ही या दृष्टीने विचार करा, असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला.
शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइम सिनेमागृहादरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. आपल्या मनोगतात नितीन गडकरी म्हणाले, मी पुढच्या वर्षात पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉर बांधतोय. त्यासाठी जवळपास ४० हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. हे बांधताना रस्ताच्या बाजूला ज्या मोकळ्या जमिनी असतील, त्यावर दुसरे पुणे वसविता येईल. तसेच अहमदनगर-कल्याण या मार्गावर जवळपास ५ लाख हेक्टर्स मोकळी जमीन उपलब्ध आहे. शिवाय त्या खूप स्वस्तात मिळतील. त्या ठिकाणी दुसरे पुणे वसवून त्यांना मेट्रो व रस्त्याने जोडता येईल, यामुळे पुणे शहरावर पडणारे ताण कमी होईल.
------------------
पुण्याचे तिन्ही प्रश्न सुटले याचा आनंद :
पुणे शहराच्या तीन प्रमुख प्रश्नांवर बोलताना गडकरी म्हणाले मेट्रो, विमानतळाची जागा व मुळा-मुठा नदीचा विकास हे प्रश्न आता मार्गी लागले आहे. पुणे मेट्रोचे काम ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामदेखील लवकरच पूर्णत्वास जाईल. पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे कामदेखील सुरू आहे. आणखी १३ हेक्टर्सच्या जागेची गरज आहे. वायुदलास चंदीगड येथे जागा हवी आहे. त्यांना त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात वायुदलाने पुणे विमानतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यालादेखील मंजुरी मिळाली असून त्याच्याही कामास लवकरच सुरुवात होईल.
-----------
तर मेट्रोने पुणे पश्चिम महाराष्ट्रशी जोडणार :
पुणे मेट्रोच्या एक किमीसाठी ३८० कोटी रुपयांचा खर्च झाला. नागपूर मेट्रोच्या एक किमीसाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च झाला. पण मी अशी मेट्रो शोधली आहे की, त्याच्या एक किमीसाठी केवळ १ कोटी रुपये खर्च येईल. त्याचा वेग ताशी १४० किमी प्रतितास वेग, इकोनॉमी क्लास आणि बिझनेस क्लासचे डब्बे, मोफत वायफाय-टीव्ही अशा सुविधा असतील. नागपूरसाठी १०० डब्यांची ऑर्डर दिली आहे. पुण्यासाठीदेखील १०० डबे घेता येईल. रेल्वे स्थानकावरून मेट्रोच्या ८ डब्यांची मेट्रो धावू शकते. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते लोणावळा, पुणे-बारामती या मार्गावरून मेट्रो सुरू करता येईल. त्याचे तिकीट दरदेखील एसटीच्या तिकीट दराइतके असेल. मात्र प्रवास वेगवान व चांगला होईल. अजित पवार यांनी पुण्यासाठी मेट्रोचे १०० डबे द्यावे, असे गडकरी यांनी सुचविले.