पुणे: निकाल लागल्यानंतर १३ दिवसांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदांचा निर्णय झाला. त्यात जिल्ह्याला उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर पुन्हा १२ दिवसांनी जिल्ह्याला ३ मंत्रीपदे मिळाली. आता या मंत्ऱ्यांना कोणती खाती मिळणार याची प्रतिक्षा लागली आहे. दोन दादांपैकी पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान मंत्रीपद मिळाले नाही अशा नाराज आमदारांना तुम्ही थोडी वाट पहा अशी समजूत काढत, त्यांच्याशी अडीच वर्षांचा वायदा केला असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांच्यापैकी कोणीही उघडपणे नाराजीचा शब्दही काढायला तयार नाहीत.
मंत्रीपदासाठी नावे निश्चित करताना पिंपरी-चिंचवडवर मोठाच अन्याय झाल्याचे दिसते आहे. तिथून महेश लांडगे मंत्रीपदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांनाही थांबावे लागणार असेच दिसते आहे. त्याशिवाय पुणे शहरातून कॅन्टोन्मेट मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांना सामाजिक समिकरणातून संधी मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र त्यांची निराशा झाली आहे. पुरंदरमधून विजयी झालेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबायला सांगितले आहे. त्यांना यावेळी कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. दिलीप वळसे यांना अजित पवार डावलतील असे अपेक्षीत होते. त्यामुळे त्यांच्या आंबेगाव मतदारसंघात निराशा पसरली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर आलेल्यांमध्ये वळसे यांचे नाव मोठे होते. मात्र आता त्यांच्यावर मंत्रीपदासाठी थांबण्याची वेळ आली आहे.
तुम्हालाही संधी मिळेल
मंत्रीपद न मिळालेल्या जिल्ह्यातील इच्छुक आमदारांना ‘तुम्हालाही संधी मिळेल’ असे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यातही भाजपच्या आमदारांना सबूरीचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या आमदारांची संख्या बरीच मोठी आहे, त्यामुळेच इच्छुकांची संख्याही जास्त आहे, प्रत्येकाला मंत्री करणे शक्य नाही हे समजून घ्या, पुढील मंत्रीमंडळ विस्तारात किंवा अडीच वर्षांनी तुमचा विचार नक्की केला जाईल अशा शब्दांमध्ये वरिष्ठ नेत्यांनी नाराज आमदारांची समजूत घातली आहे.
मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
दरम्यान जिल्ह्यात मंत्रीपद मिळालेले चंद्रकांत पाटील व दत्ता भरणे हे अनुभवी मंत्री आहेत, तर पर्वती मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेल्या माधुरी मिसाळ यांना प्रथमच संधी मिळाली आहे. या मंत्र्यांना खाती कोणती मिळतील याची प्रतिक्षा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. मिसाळ यांचा समावेश राज्यमंत्री म्हणून झाला आहे. त्यांना महिला बाल कल्याण किंवा महिलाविषयक अन्य खाते दिले जाईल अशी चर्चा आहे. भरणे मागील सरकारच्या काळातही राज्यमंत्रीच होते. यावेळी त्यांना महत्वाचे खाते दिले जाईल अशी चर्चा आहे. चंद्रकांत पाटील मागील सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. ते भाजपतील ज्येष्ठ आहेत. त्यामुळे यंदा त्यांनाही दुसरे महत्वाचे खाते मिळेल असे बोलले जाते. खुद्द अजित पवार हे अर्थमंत्री असतील असे खात्रीलायकपणे त्यांच्याच पक्षातून सांगितले जात आहे.
पुण्याचा पालकमंत्री कोण होणार?
जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला हा कळीचा प्रश्न आहे. मागील सरकारच्या काळात अजित पवार सहभागी व्हायच्या आधी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच पालकमंत्रीपद होते. अजित पवार यांनी मात्र सत्तेत सहभागी झाल्यानंतर लगेचच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले. आताही तेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतील असे राजकीय वर्तुळातून खात्रीने सांगण्यात येत आहे. पाटील यांना दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.