पुणे : पुणे परिसरातील २३ गावांच्या समावेशाचा अध्यादेश राज्य सरकारने काढल्यानंतर, पुणे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील क्रमांक एकचे शहर बनले आहे. यामुळे हडपसरसह अन्य गावांची स्वतंत्र महापालिका तयार करण्याचा प्रस्ताव आता बासनात बंद झाला आहे.
पु्ण्यालगतच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याची प्रक्रिया सन २०१७ पासून चालू झाली. यातल्या पहिल्या ११ गावांच्या समावेशाला तीन वर्षांपुर्वी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला. उर्वरीत २३ गावांच्या समावेशाची प्रक्रिया आता पूर्ण झाल्यानंतर पुणे महापालिकेचे क्षेत्र ४८० चौरस किलोमीटर होणार आहे. मुंबई महापालिकेचे क्षेत्रफळ ४५० चौरस किलोमीटर आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आणि भोवताली असणाऱ्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर गर्दीच्या शहरांमुळे मुंबईच्या विस्ताराची शक्यता आता कायमस्वरुपी मावळली आहे. त्यामुळे पुढची काही दशके तरी पुणे हेच राज्यातील सर्वात मोठे शहर ठरणार आहे.
चौकट
गेल्या पंचवीस वर्षात असे वाढले पुणे
सन १९९७ मध्ये पुणे अडीचशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे शहर होते. महापालिकेचा ठराव आणि शासन निर्णयानुसार सन २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश झाला आणि पुणे शहर ३३० चौरस किलोमिटर क्षेत्रफळ असणारे झाले. आता सन २०२० मध्ये हे आकारमान ४८० चौरस किलोमीटर होणार आहे.
चौकट
निवडणुकीचे राजकारण
गेल्या चार वर्षात पुण्यात समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी आहे. त्यामुळे या गावांच्या समावेशाला आजवर भाजपने फारसा उत्साह दाखवला नव्हता, असा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप होता. मात्र न्यायालयाच्या रेट्यामुळे हा निर्णय कधी ना कधी होणारच होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसला ताकद देणारा ठरेल, असे सांगितले जाते.
चौकट
आर्थिक कसरत
राज्यातली सर्वात मोठी महापालिका हे बिरुद पुण्याला मिळणार असले तरी नव्या गावांच्या विकासासाठी पुरेशी आर्थिक ताकद करण्याचे आवाहन राज्य सरकारपुढे आणि पुणे महापालिकेपुढे असेल. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हे आव्हान आणखी अवघड झाले आहे. ‘ना शहरात विकास ना, नव्या गावांना पैसा,’ अशा दुष्टचक्रात पुणे अडकणार नाही, याची खबरदारी सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
चौकट
अर्ध्या कोटींचे शहर
नव्या गावांच्या समावेशानंतर पुण्याची लोकसंख्या पन्नास लाखांच्यापुढे जाणार आहे. या लोकसंख्येसाठी वर्षाला १८.९४ टीएमसी पाण्याची गरज लागेल, असे महापालिकेने गृहीत धरले आहे. पुणे महापालिकेप्रमाणेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अंतर्गत येणारे क्षेत्र देखील ६ हजार ६१६ चौरस किलोमीटर इतके राज्यात सर्वाधिक आहे. मुंबई प्रदेश महानगराच्या अंतर्गत 4 हजार ३५४ तर नागपुर प्रदेश महानगर अंतर्गत ३ हजार ५६७ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. परिणामी पुणे शहर आणि लगतचा भाग हा राज्यात सर्वात वेगाने विकसीत होणारा परिसर बनला आहे.