पुणे : आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अवघा एक महिना शिल्लक राहिलेला असताना महापालिकेच्या मिळकतकर विभागाची वसुली अद्यापहीहजार कोटींच्या आतच आहे. १ हजार ८६१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, या विभागाने आतापर्यंत ९६२ कोटी ७३ लाख रुपये वसूल केले आहेत. अंदाजपत्रकातील तूट यामुळे वाढणार असून, ती कमी व्हावी यासाठी विभागाने आता कसून मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.चालू आर्थिक वर्षाने (सन २०१७-१८) महापालिकेचा आर्थिक कणाच मोडला आहे. मिळकतकर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. या विभागाने प्रशासनाला या वर्षात १२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. आयुक्तांनी त्यांचे अंदाजपत्रक सादर करताना, ते सोळाशे कोटी केली. स्थायी समितीने त्यात बदल करून, ते १ हजार ८६१ कोटी रुपये केले. आता आर्थिक वर्ष संपण्यास फक्त मार्च हा अखेरचा महिना शिल्लक राहिला आहे व या विभागाची वसुली फक्त ९६२ कोटी ७३ लाख रुपये झाली आहे.अंदाजपत्रकातील तूट त्यामुळे खूप वाढली असून, त्यातूनच यावर्षी या विभागाला फक्त १ हजार ६०० कोटी रुपयांचेच उद्दिष्ट देण्यात आले आहे. वास्तविक या विभागाला अगदी सहजपणे २ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे. शहरात किमान ४ ते ५ लाख मिळकती नोंदणी नसलेल्या आहेत. त्यांची दप्तरी नोंदच नसल्याने त्यांना कर लावला जात नाही. त्यांचा शोध घेण्याचा खात्याकडून प्रयत्न होत नाही. त्यासाठी जीआयएस या उपग्रहावर आधारित अत्याधुनिक यंत्रणेचे साह्य घेण्यात आले होते. त्यांनी ३ लाखांपेक्षा जास्त मिळकती शोधल्या, मात्र त्यातील ७६ हजार मिळकती वगळता उर्वरित मिळकतींचे महापालिकेकडून आधीच मोजमाप होऊन त्यांना कराची बिलेही गेली होती.आता महापालिका आयुक्तांनी गेल्या दोन महिन्यांत मिळकतकर विभागाला वसुली वाढवण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे या विभागाने मोहीम सुरू केली आहे. त्यात गेल्या महिनाभरात एकूण १ हजार ८९८ थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वादन करण्यात आले. त्यातून ३३ कोटी ८६ लाख रुपयांची वसुली झाली.बँड वाजवल्यानंतरही ज्यांनी कर जमा केला नाही, अशा ५८ मिळकतींना सील ठोकण्यात आले आहे. त्याशिवाय विविध पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांच्याकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील थकबाकीदारांची नावे देण्यात आली आहेत. कर जमा केला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यातयेणार आहे.समाविष्ट गावातुन ७ कोटींची वसूली-महापालिका हद्दीत नुकतीच ११ गावे समाविष्ट झाली आहेत. त्यांच्याकडून याचवर्षींपासून प्रशासनाने मिळकत कर वसुली सुरू केली आहे. या गावांमधील १३ हजार ८५२ मिळकत कर धारकांकडून ७ कोटी १३ लाख रूपये वसूल करण्यात आले आहेत.गावांमधील सर्व मिळकतींचे महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण केले असून मोजमापे घेऊन क्षेत्रफळानुसार त्यांना कराची बीले दिली आहेत. किमान ५ लाख मिळकतींची नोंद झाली आहे. मात्र या गावांमधील मिळकत धारकांकडून अद्याप कर जमा करण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.समाविष्ट गावांमधील मिळकतधारकांना प्रशासनाने कर जमा करण्यासाठी तगादा लावू नये. त्यांना त्रास देऊ नये व कारवाई तर करूही नये. नुकतीच ही गावे महापालिकेत आली आहेत. महापालिकेने प्रथम त्यांना चांगल्या नागरी सुविधा द्याव्यात. रस्ते, पाणी, पथदिवे, गटारी यांची व्यवस्था करावी व त्यानंतरच कर वसुलीसाठी जोर लावावा. तसेच सरकारी नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीचा कर व महापालिकेचा कर यांच्यात जी तफावत असेल ती पुढली सलग ५ वर्षे टप्प्याटप्याने वसूल करावी असाही नियम आहे, त्याचे पालन प्रशासनाने करावे.-श्रीरंग चव्हाण,अध्यक्ष, हवेली तालुका कृती समिती
पुणे : महापालिकेचे उद्दिष्ट अठराशे कोटींचे; समाविष्ट गावांमधूनही होणार वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 7:22 AM