पुणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत गुरुवारी रात्री बारा वाजता संपली. त्यामुळे शुक्रवारपासून शहरात १३ जुलैपूर्वी प्रमाणेच व्यवहार सुरू राहणार आहेत. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी व्यापारी महासंघाने केलेल्या मागणीला मात्र प्रशासनाने प्रतिसाद दिलेला नाही.
नागरिकांना व्यायाम करण्यास बाहेर पडता येणार आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवा, सेवा व्यवसाय पूर्ववत सुरू राहणार असल्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. शहरात १३ जुलै ते २३ जुलै या दहा दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याची मुदत संपताच नवीन आदेश निर्गमित करण्यात आले असून यापूर्वीचेच आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांना मात्र पी-१, पी-२ पद्धतीप्रमाणे दुकाने उघडावी लागणार आहेत. नागरिकांना रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
यासोबतच ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि दहा वर्षांखालील मुलांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्येही १५ टक्के कर्मचारी काम करू शकणार आहेत. यासोबतच नागरिकांना सेवा देणारे व्यवसाय पूर्ववत सुरू राहणार आहेत.
----////----
* व्यायाम :- सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे याला परवानगी देण्यात आली असून मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, खासगी-सार्वजनिक अथवा पालिकेच्या मोकळ्या मैदानांमध्ये अथवा सोसायटीच्या मैदानांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून व्यायाम करता येणार आहेत. मात्र, ओपन जिम आणि तत्सम व्यायाम प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे.
* सेवा :- प्लंबर, विद्युत विषयक कामे, पेस्ट कंट्रोल यासह सर्व प्रकारच्या तांत्रिक स्वरूपाच्या व्यवसाय, सेवा आणि गॅरेज व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे.
* दुकाने :- मॉल-व्यापारी संकुले बंदच राहणार आहेत. परंतु, बाजारपेठा, रस्त्यावरील दुकाने 'पी-१, पी-२' पद्धती प्रमाणे सुरू राहणार आहेत. दुकानांमध्ये ट्रायल रूमचा वापर करण्यास मनाई असून विक्री केलेले कपडे बदलून देण्यासही मनाई करण्यात आली आहे. दुकानातील कामगार आणि दुकानमालक प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील असावेत तसेच कामगारांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
* पालिकेच्या मंडई गाळ्यांना सम विषम तारखेप्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
* लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी केवळ २० नागरिकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
* सार्वजनिक ठिकाणी पान-तंबाखू-मद्य सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
* अत्यावश्यक सेवा :- सर्व प्रकारचे दवाखाने, औषध दुकानांसह अन्न प्रक्रिया-कृषी प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंगसह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास पूर्वीप्रमाणेच परवानगी देण्यात आली आहे.
* माहिती तंत्रज्ञान विषयक, हार्डवेअर, यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या औद्योगिक आस्थापना यांना परवानगी आहे.
* ई कॉमर्स :- ऑनलाईन घरपोच वस्तू वितरणास परवानगी देण्यात आली असून माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रालाही परवानगी देण्यात आली आहे.
* घरकाम करणाऱ्या कामगार, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी लागणाऱ्या व्यक्ती यांना परवानगी देण्यात आली आहे.
* वर्तमानपत्रांचे वाटप यापुढेही सुरळीत सुरू राहणार आहे.
* बँका, एटीएम, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्यांचे कामकाज सुरू राहणार आहे.
* हॉटेल्स :- हॉटेल्स, उपहारगृहे येथून पूर्वीप्रमाणेच पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे.
* मजुरांची राहण्याची व्यवस्था असलेल्या बांधकाम साईट्स सुरू राहणार आहेत.
* महापालिकेची अत्यावश्यक कामे, पावसाळापूर्व कामे, मेट्रोची कामे, धोकादायक इमारतींची कामे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
-------
व्यापारी महासंघाने 'पी-१, पी-२' पद्धत रद्द करून आठवड्यातील पाच दिवस दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. मंगळवार आणि बुधवारी लॉकडाऊन करून उर्वरित पाच दिवस पूर्णवेळ व्यवहार सुरू ठेवण्याची मागणी केली होती. परंतु, या मागणीला यश आले नाही.