पुणे : पुण्यात अनेक प्रश्न आहेत. त्यात २३ गावे आणि आता ११ गावे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे पुण्याची महापालिका देशात सर्वात मोठी ठरली आहे. म्हणूनच पुण्याचे दोन भाग करायला हवेत. यामुळे काम करायला सोपे जाईल. वाढती लोकसंख्या ही एक समस्या आहे. त्यावरही शांतपणे विचार करायला हवा, असे उच्च, तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एका कार्यक्रमानंतर पुण्यात पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्यांना पुण्याच्या प्रश्नांबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, इथला वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी मी पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील, ते पाहिले आहे. चौका-चौकात वाॅर्डनची संख्या वाढवायची आहे. खरंतर लोकसंख्या वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. पुणे हे राहण्यासाठी सुरक्षित शहर असल्याने इथे लोकं येतात. चांदणी चौकात सिक्स लेन होत नाही, तोपर्यंत गर्दी राहणारच आहे. वाहनचालकांनी महामार्गावर लेन तोडू नये. लेन कटिंग केल्याने कोंडी होते. सर्व रांगेत गेले तर वाहतूक लवकर सुटेल.
सीईटीचा निकाल लवकरच
राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू नियुक्ती रखडल्या आहेत. लवकरच त्या होतील. सीईटीच्या परीक्षेचा निकालही येत्या आठवड्यात लागणार आहे, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते कसे?
पुण्याचे आकर्षण असलेल्या माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या ‘पुणे फेस्टिवल’मध्ये भाजप नेते येणार आहेत. पुणे फेस्टिवलचं शुक्रवारी (दि. २) उद्घाटन होणार असून, त्याच्या उद्घाटनाला भाजपचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. कलमाडी यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप आहेत. भाजपनेच अनेकदा टीका केली, तरी त्यांच्या फेस्टिवलला भाजपचे मोठे नेते का येत आहेत? असे पाटील यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, गणेशोत्सव ही आपली संस्कृती आहे. चांगल्या कामासाठी आम्ही सर्व सोबत आहोत आणि आलेच पाहिजे. पुणे फेस्टिवलला हजेरी लावणे म्हणजे कलमाडी यांचे गुन्हे माफ करणे, असा होत नाही. हा कार्यक्रम वेगळा आहे.