पुणे: पुणे शहरात रेमडेसिविर चा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनेक खासगी व सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांची भरती थांबवण्याची वेळ आली आहे. हे चित्र आजच्या भयाण परिस्थितीत नक्कीच चांगले नाही. त्यामुळे ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर यांच्या पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असेल ती त्यांनी पूर्ण क्षमतेने उभी करावी. या संबंधीची भावना आम्ही राज्य सरकारकडे केली आहे राज्य सरकारने पुण्याचे नाशिक होऊ देऊ नये असेही आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
पुण्यातील उद्भवलेल्या परिस्थितीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले.यावेळी ते बोलत होते.मोहोळ म्हणाले,पुण्यातील ऑक्सिजन व रेमडेसिविर च्या समस्येवर आज विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यात लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेल्या परिस्थितवर मार्ग निघेल अशी आशा आहे. पुणे शहरात खासगी व सरकारी हॉस्पिटल मिळून साधारण २५० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज पुण्याला लागतो.मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यात कमतरता निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक रुग्णालयातील गंभीर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले. तसेच काही ठिकाणी भरती थांबवावी लागली.पण आता पुरेसा साठा ऑक्सिजनचा निर्माण झाल्याशिवाय ऑक्सिजन बेड सुरू करणे शक्य नाही. ही परिस्थिती वाईट आहे.
रेमडेसीविरचा विषय जसा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे तसा ऑक्सिजनचा अन्न व औषध पुरवठा प्रशासनाच्या नियंत्रणात येतो.त्यामुळे त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत खूप अगोदर पावले उचलायला हवी होती. मात्र आता तरी मार्ग काढणे आवश्यक आहे.