खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय, यामुळे पुणे शहरातील मुठा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. नदी पात्राच्या बाजूने असणाऱ्यांना लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी २४ ऑगस्ट रोजी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २७,८४१ क्युसेक विसर्ग वाढवून रात्री १०.०० वाजता ३१, ५१५ क्युसेक करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची नोंद घ्यावी, अशी माहिती दिली आहे. तसेच नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज रात्री ९ वाजल्यापासून पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती झाली आहे.
रात्री ११ वाजता ३५ हजार ३१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरणातून रात्री ११.०० वा. मुठा नदी पात्रात ३५ हजार ३१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं जिल्हा प्रशासनाने आवाहन केले.
पुढील 48 तासात 'या' जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस
मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार (Heavy Rain) सुरूच आहे. आज देखील राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसला. आज शनिवार दि. २४ ऑगस्ट सकाळ ते सोमवार दि.२६ ऑगस्टच्या सकाळपर्यंतच्या ४८ तासात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Rain Update) वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील ४८ तासात अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानुसार विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १४ जिल्ह्यात पुढील ४८ तासात तर अतिजोरदार पावसाचीही शक्यता जाणवते.
रविवार दि. २५ ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होणाऱ्या जलविसर्गाच्या शक्यतेतून, संबंधित नद्यांच्या खोऱ्यात कदाचित पूर-परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.