श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : ‘‘माझ्यासह पुणेकरांची एक खंत आहे की, आपल्याकडे सरकारी विमानतळ नाहीय. ते असले पाहिजे. सध्या जे आहे ते संरक्षण विभागाचे आहे. पण आपले स्वतंत्र विमानतळासाठी आम्ही अनेकदा मिटिंगा घेतल्या. पण त्यावर मार्ग निघालेला नाही. त्यासाठी लोकं जमिनी द्यायला का कू करतात. पण कधी ना कधी पुणेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणूसे मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी (दि.२०) गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूजनांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
पवार यांनी याप्रसंगी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मराठीला अभिजात दर्जा मिळायलाच हवा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत. आम्ही नुकताच विधीमंडळात ठराव केला असून, तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. राज्यातील १३ कोटी जनता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पाहत आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही पवार यांनी सांगितले.फडणीस ऐवजी फडणवीस !
अजित पवार मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे नाव घेताना सतत फडणवीस असेच बोलत होते. त्यामुळे सभागृहात कुजूबज सुरू झाली. कदाचित पवारांना फडणवीस बोलायची सवय लागल्याने ते फडणीस यांना फडणवीस असे बोलत आहेत की काय ? अशी चर्चा रंगली होती.