Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 01:00 PM2024-08-04T13:00:36+5:302024-08-04T13:01:23+5:30

आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत

Pune People in danger areas of Pune should be shifted to safe places Instructions to Chief Minister eknath shinde Administration | Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे : पुणे शहरात काल रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.  या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. मागील महिन्यात एका दिवसाच्या पावसाच्या पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत. 

संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

या भागात आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर,  बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले आहे. 

Web Title: Pune People in danger areas of Pune should be shifted to safe places Instructions to Chief Minister eknath shinde Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.