पुणे : शहरातील रस्त्यावरील खड्डयांच्या साम्राज्याला आम्हीच जबाबदार आहोत, अशी कबुली स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली असून, येत्या पंधरा दिवसात शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहिर केले आहे. तर दुसरीकडे पाऊस पूर्णपणे उघडल्याशिवाय शहरातील रस्त्यांची दुरूस्ती अशक्य असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. परिणामी पुणेकरांना आणखी किती दिवस खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.
महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या जुन्या जलवाहिन्या तसेच ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी व अन्य कारणांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये झालेली रस्तेखोदाई व गेल्या आठ दिवसातील पावसामुळे शहरातील सर्व रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या सर्वांचा त्रास करदात्या पुणेकरांना सहन करावा लागत असून, खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे़ याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना विचारले असता, या खड्डेमय रस्त्याला आम्हीच जबाबदार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मध्यवर्ती शहरातील जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम लॉकडाउनमध्ये सुरू करण्यात आले होते. यामुळे रस्त्यांची खोदाई करावी लागली असून, सलग पडलेल्या मोठ्या पावसामुळे दुरूस्त करण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत. मात्र येत्या पंधरा दिवसात सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्ते दुरूस्तीला तारखांवर तारखा
शहरात ड्रेनेज, पाणी पुरवठा, केबलसाठी रस्ते खोदाईची कामे मोठ्या प्रमाणात झाली असून, विशेषत: शहराच्या मध्यतर्वी भागात म्हणजेच शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह अन्य रस्त्यांवर ड्रेनेज, पाईपलाईनची कामे करण्यात आली. परंतु, महापालिका नियमानुसार ३० एप्रिल पर्यंत रस्ते खोदाईलाच परवानगी असते. पण याला नियमाला ठेकेदारांकडून हरताळ फासण्यात आला असून, महापालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्डयांमुळे वाहतुकीची पूर्णत: बोजवारा उडल्याने, संंबंधित ठेकेदारांना १५ जूनपर्यंत सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पुर्ण करण्याचे आदेश दिल्याचे सत्ताधारी पक्षाने सांगितले. मात्र वरवरची मलमपट्टी केल्याने, या सर्व रस्त्यांवरील संबंधित भाग पूर्णत: धसला असून, सत्ताधाऱ्यांचे खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन आश्वासनच राहिले आहे. त्यातच आता पुन्हा नव्याने पंधरा दिवसात रस्ते खड्डेमुक्त करू असे आश्वासन देण्यात आले आहे़
सतत पाऊस सुरू असल्याने खड्डे बुजवणे कठीण
इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील रस्ते आजही चांगले आहेत. असे सांगतानाच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी, पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले ही वस्तुस्थिती असल्याचेही कबुल केले आहे. व सध्या सतत पाऊस सुरू असल्याने खड्डे बुजवणे कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महापालिकेकडे खड्डे बुजविण्यासाठीची सर्व यंत्रणा तयार असून, जसा पाऊस उघडीप देईल तशी आम्ही खड्डे बुजविण्याची कार्यवाही त्वरीत करत आहोत. मात्र पाऊस पूर्णपणे उघडल्याशिवाय संपूर्ण रस्तेदुरूस्ती शक्य नसल्याचेही डॉ खेमणार यांनी स्पष्ट केले आहे.