पुणे : ‘पीएमपी’कडून महिला प्रवाशांसाठी २०१८ मध्ये ‘तेजस्विनी महिला बससेवा’ सुरू करण्यात आली. मात्र, अलीकडच्या काळात या बसेसमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ‘पीएमपी’ने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी ही बससेवा सुरू केली होती. मात्र, ही सेवा गेल्या काही दिवसांपासून दिसेनाशी झाली आहे.तेजस्विनी महिला विशेष बससेवा ८ मार्च २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुरू करण्यात आल्या. त्यावेळी ‘पीएमपी’ने प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला या बसमधून महिला मोफत प्रवास करू शकतील असे जाहीर केले होते. महिन्याच्या इतर दिवशीही बसचा ताफा शहरातील रस्त्यांवर सशुल्क तिकिटांसह गर्दीच्या वेळेत कार्यरत राहील, असे सांगण्यात आले होते. ज्यावेळी सेवेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हा तेजस्विनी महिला बससेवा शहरातील सर्वांत व्यस्त १९ मार्गांवर सुरू करण्यात आल्या होत्या. सध्याच्या आकडेवारीनुसार केवळ १३ मार्गांवर या बस सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.सुरुवातीचे तेजस्विनी बसचे मार्गस्वारगेट ते येवलेवाडी, स्वारगेट ते हडपसर, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, म.न.पा. भवन ते लोहगाव, कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते म.न.पा. भवन, हडपसर ते वाघोली (केसनंद फाटा), अप्पर डेपो ते स्वारगेट, अप्पर डेपो ते पुणे स्टेशन बीरआरटी, अप्पर डेपो ते पुणे स्टेशन, म.न.पा. भवन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन, निगडी ते पुणे स्टेशन (औंध मार्गे), निगडी ते भोसरी, निगडी ते हिंजवडी माण-फेज-३, चिंचवडगाव ते भोसर, चिखली ते डांगे चौक अशा मार्गांवर सेवा सुरू होती.सध्या सुरू असलेले मार्ग असेमार्केट यार्ड डेपो ते पिंपळे गुरव, कात्रज ते महात्मा हाउसिंग बोर्ड, भेकराईनगर ते एनडीए १० क्र. गेट, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, कोथरूड डेपो ते कात्रज, स्वारगेट नटराज स्टॅण्ड ते धारेश्वर मंदिर, शेवाळेवाडी ते कात्रज नागेश्वर विद्यालय, चिखली ते डांगे चौक, गव्हाणे वस्ती, भोसरी ते निगडी टिळक चौक, भक्ती-शक्ती ते मेगा पोलिस फेज -३, पुणे स्टेशन ते पुणे स्टेशन, भेकराईनगर ते भेकराईनगर, एनडीए १० क्र. ते एनडीए १० क्र. गेट. (वर्तुळ मार्ग)‘तेजस्विनीचा तेज होतोय कमी’महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी एक आदर्श ठरली होती. ८ मार्च २०१८ पासून ८ मार्च २०१९ पर्यंत तेजस्विनी बसमधून प्रतिमहिना २ लाख ३३ हजार, तर वर्षभरात २८ लाख महिलांनी प्रवास केला होता. या वर्षाच्या चालू आकडेवारीनुसार प्रवासी संख्या घटली आहे. २०२४ मध्ये प्रवासी संख्या १७६० पर्यंत आली असून, बस मार्ग १३, तर बस संख्या १५ पर्यंत आली आहे.महिन्याच्या ८ तारखेलाही तिकीटच ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने पीएमपी प्रशासनाने तेजस्विनी बसची सुरुवात करताना दर महिन्याच्या ८ तारखेला महिलांना मोफत प्रवास अशी घोषणा केली होती. मात्र, करोनानंतर ही मोफत सेवा बंद करण्यात आली असून, आता ही बंदच आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आठ तारखेला महिलांना मोफत प्रवास ही योजना ‘पीएमपी’ने गुंडाळली असल्याचे दिसून येत आहे.
तेजस्विनी महिला विशेष बस १३ मार्गांवर सुरू आहेत. त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार त्या सेवेसाठी धावतात. तसेच त्याव्यतिरिक्त ही बस सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. महिलांचा प्रतिसाद कमी मिळत होता, तसेच अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मार्ग कमी करण्यात आले.- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, ‘पीएमपीएल’