भाग्यश्री गिलडा
पुणे : कधी ब्रेकडाऊन, कधी स्क्रॅप तर कधी ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट संपले... अशा विविध कारणांवरून पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे. दुसरीकडे पुणे परिवहन महामंडळाने ताफ्यात नवीन बस आणण्यासाठी राबविलेल्या प्रक्रियेला कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नाही. फेब्रुवारी महिन्यात सुरू केलेल्या बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेला ऑगस्ट उलटून गेला तरी चांगला प्रतिसाद मिळाला नाही, असे महामंडळाच्याच अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून पुणेकरांची लाइफलाइन असलेली पीएमपीच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे दिसून येत आहे.
पीएमपीच्या सातपैकी २ ठेकेदारांची सेवा संपली आहे. त्यामुळे सुमारे २३३ बस या प्रवासी सेवेतून बाद झाल्या आहेत. तर जून महिन्यात ६० बसेसचे १२ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे. त्यातच बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाणही वाढत चालले आहे. बसची संख्या मुळात कमी असताना नवीन बसचा मार्गदेखील खडतर ठरत आहे. याचा फटका पीएमपीसोबतच प्रवाशांना बसत आहे.
बसची संख्या घटली निम्म्याने
‘पीएमपी’ची प्रवासी संख्या २०१६ मध्ये १० लाख होती. त्यावेळी ‘पीएमपी’च्या २ हजार ५५ बस संचालनात होत्या. त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच २०२४ मध्ये ती १३ ते १४ लाख झाली आहे. यावेळी फक्त १ हजार ५२८ बस मार्गावर असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरी पडेल, अशी यंत्रणा उभी करण्यात ‘पीएमपी’ला अपयश आल्याचे आणि त्यातूनच वाहतुकीची भीषण समस्या उभी राहिल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
महामंडळासमोर मोठे आव्हान
पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ५०० बस १२ वर्षे पूर्ण झाल्यामुळे पुढील काही महिन्यांतच त्या संचालनातून बाहेर पडणार आहेत. अशातच तिसऱ्यांदा फेरनिविदा प्रक्रिया सुरू करूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ब्रेकडाऊनचे सत्र कायम
पीएमपीच्या ताफ्यातील सरासरी ५० बस रोज रस्त्यावरच संचालनादरम्यान बंद पडतात. त्या दुरुस्त होऊन रस्त्यावर पुन्हा संचलनात येण्यासाठी कमीत कमी ३ ते ५ दिवसांचा वेळ लागतो. त्यामुळे ब्रेकडाऊन झालेल्या बसच्या जागी धावणाऱ्या बसची संख्या बघता प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘त्या’ १७७ बस अजूनही प्रतीक्षेत
पीएमपीने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२१ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात एकूण ६५० बस दाखल होणार होत्या. त्यापैकी १७७ बस अद्याप ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. या सगळ्या अडचणींवर मात करून महामंडळ काय तोडगा काढणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.
‘गो पीएमपी’ ॲप्लिकेशनसाठी तारीख पे तारीख
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी ‘पीएमपी गो’ नावाचे ॲप्लिकेशन सुरू केले जाणार होते. हे ॲप्लिकेशन पुढील १५ दिवसांत प्रवाशांच्या भेटीला येणार असल्याचे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगण्यात आले होते. मात्र या ॲप्लिकेशनमध्ये टेस्टिंगदरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या. त्या दूर झाल्यानंतर हे ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे वारंवार पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात येते.
औंधला बस डेपो कधी?
औंध येथील जकात नाक्याच्या जागेवर पीएमपीचा बस डेपो सुरू करण्यात आला होता. या जागेतील स्क्रॅप बस आणि काही बांधकामाशी संबंधित गोष्टी पूर्ण झाल्यावर एक महिन्यात औंधचा बस डेपो सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्याला दोन महिने उलटून गेले तरी औंध येथे बस डेपो सुरू झालेला नाही.
अनेक प्रकल्प धूळ खात
‘पीएमपी’चा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प आणण्याचा काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला; मात्र वारंवार बदली झाल्याने अनेक प्रकल्प रखडत गेले. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यायला हवा, यासाठी ‘पीएमपी’चे प्रशासन नेहमी तत्पर असते, असे अधिकारी वारंवार सांगतात; मात्र ‘पीएमपी’चे प्रकल्प सुरळीत चालवण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने अनेक चांगले प्रकल्प कागदोपत्री धूळ खात आहेत.
पीएमपीच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रिया सुरू आहे, मात्र त्याला प्रतिसाद चांगला मिळत नसल्याने सीएनजी बस कधी प्रवासी सेवेत दाखल होतील, याचा अंदाज सांगता येणार नाही. पीएमपी प्रशासनाने सीएनजी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. - नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल