पुणे : महिलेला उसने दिलेले ५० हजार रुपये परत मिळवून देण्यासाठी व त्या महिलेची तक्रार न घेण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी करुन २ हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हवालदाराला पकडले. अनिल निवृत्ती होळकर (वय ५२) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, अनिल होळकर याची चंदननगर पोलीस ठाण्यात सध्या नेमणूकीला आहेत. तक्रारदार यांनी एका महिलेला ५० हजार रुपये उसने दिले होते. ती महिला ते पैसे परत देत नव्हती. हे पैसे मिळवून द्यावे व त्या महिलेची कोणतीही तक्रार घेऊ नये, यासाठी हवालदार अनिल होळकर याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मंगळवारी त्याची पडताळणी केली. त्यात त्याने २ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर रात्री खराडी येथील शिवराणा पोलीस चौकीजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेताना अनिल होळकर याला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वी करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार तपास करीत आहेत.