पुणे : सध्या शहरात एकीकडे रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असताना या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला आहे. तो रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 7 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन टोळ्या पकडून 5 आरोपींना युनिट 4 गुन्हे शाख यांनी जेरबंद केले आहे.
दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णाला उपयुक्त असलेले रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा कोणी काळाबाजार करु नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाणे व शाखा यांचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.
बुधवारी (दि.14) गुन्हे शाखा युनिट -4 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील व पोलीस अंमलदार गस्त घालत असताना पोलीस हवालदार रमजान शेख यांना माहीती मिळाली की, एक व्यक्ती वाघोली परीसरात कोरोना आजारावरील उपचारासाठी पुरविण्यात येणारे रेमडेसिविर हे इंजेक्शन काळाबाजार करुन 10 हजार रु किंमतीस एक नग या प्रमाणे स्वत:चे आर्थिक फायदयाकरिता विक्री करीत आहे. याबाबत औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानुसार रोहिदास बनाजी गोरे रा.गोरेवस्ती वाघोली याच्याकडे काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी बाळगलेले 2 रेमीडेसिव्हीर इंजेक्शन मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध श्रृतीका जाधव, औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस हवालदार रुपेश वाघमारे यांना डिमेलो पेट्रोलपंप नगररोड जवळ एक व्यक्ती रेमडेसिविर हे इंजेक्शन काळाबाजार करुन 18 हजार रूपये किंमतीस एक नग याप्रमाणे विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. आहे.त्याच्याकडे एक डमी गि-हाईकाला पाठविले असता मोहम्मद मेहबूब पठाण (वय 28, रा. शालीमार चौक, दौंड) याच्यासह त्याचे तीन साथीदार इम्तीयाज युसूफ अजमेरी (वय- 52, रा. 27/1 सुखरे वस्ती, खराडी, चंदननगर, पुणे, परवेज मैनोद्दीन शेख (वय 36,रा. तुकाईनगर, सिध्दटेक रोड, क्रिस्टी चर्च जवळ, दौंड), अश्विन विजय सोळंकी (वय 41, रा. नं.14, वांबुरे बिल्डींग, मेन बाजार, शनि मंदिरा जवळ,येरवडा,)यांच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शनच्या 2 बॉटल जप्त करण्यात आल्या आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेविरुध्द दिनेश खिंवसरा, औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच यापूर्वीही 11 एप्रिलला रोजी भारती पोलीस स्टेशन हददीत दत्तनगर कात्रज याठिकाणी युनिट-1 गुन्हे शाखा यांनी कारवाई करुन एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून 1 रेमडेसिविरचे इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. तर 12 एप्रिलला युनिट-3 गुन्हे शाखा यांनी खडक पोलीस स्टेशन हददीत भवानी पेठ पुणे येथे एका व्यक्तीकडून 2 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अशा प्रकारे पुणे शहर पोलीसांकडून इंजेक्शनच्या काळाबाजारावर कारवाई तीव्र करण्यात आली आहे.-------------- ------------------------------