पुणे : शहरात भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी पोलिसांनी व्यूहरचना आखली असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण आहे. त्यांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिसांकडून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बैठक पोलिस आयुक्तालयात पार पडली. शहरात कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील खाऊ गल्लीत कोयते उगारून दहशत माजविण्याची घटना नुकतीच घडली. कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या सराईतांना पोलिसांना चोप दिल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करण्यात आले. कोयते उगारून (कोयता गँग) दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्याने पत्रकारांनी अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
कारवाई व समुपदेशनातून रोखणार गुन्हे
गेल्या पाच ते सहा वर्षांत दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. अशा मुलांवर कारवाई करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातील तरतुदींचा आधार घेण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्या विरोधात तरतुदींचा आधार घेऊन कारवाई करण्यात येईल. कारवाई आणि समुपदेशानाच्या माध्यमातून अशा घटना रोखता येणे शक्य होईल. येत्या दोन ते तीन महिन्यांत याचे दृश्य परिणाम पाहायला मिळतील, असे रितेश कुमार यांनी सांगितले.