पुणे : अवघ्या एका महिन्यात लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. या दृष्टीने पुण्यातील गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांची बैठक पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित केली होती. यावेळी पुणे पोलिसांच्या वतीने मंडळांची नियमावली जाहीर करण्यात आली.
गणपती मंडळासाठी आचारसंहिता
- गणेश मंडळाने आपले मंडळ धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करुन घ्यावे. - गणपती स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक आहे.- पोलीस परवाना अर्ज स्विकृती त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचे अधिकारीतेत एक खिड़की योजना मार्फत स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.- वर्गणी सक्तीने अगर वाहने अडवून जमा करु नये. गणपती मंडप सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वानुसार रस्त्याचा १/३ भाग उपयोगात आणून बांधावा. मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना प्राप्त करावा.- मंडप व गणपती स्थापनेचे आसन मजबुत असावे. तसेच श्री मुर्तीचे पाऊस व आगीपासून संरक्षणाची काळजी घ्यावी. मुर्तीची स्थापना योग्य उंचीवर असावी.- गणेश मुर्तीची उंची मर्यादीत असावी, गणेश मुर्ती पारंपारिक असल्यास देखाव्याच्या उंचीची मर्यादा मर्यादीत असावी.- कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी. वाळुच्या बादल्या भरून ठेवाव्यात. सजावटीमध्ये हॅलोजन सारखे प्रखर दिवे लावण्याचे टाळावेत. प्रेक्षक अथवा सुरक्षा रक्षकांच्या डोळयांवर प्रखर प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी.- मंडपातील रोषणाई व विद्युतीकरणाचे काम प्रमाणपत्र असलेल्या तज्ञ वायरमनकडून करुन घ्यावे. तसेच विद्युत मंडळाचे अधिका-यांकडून तपासणी करुन घ्यावी. विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास जनरेटर, बॅट-या उपलब्ध ठेवाव्यात. - उत्सवामध्ये व मिरवणुकीमध्ये करण्यात येणा-या देखाव्याची माहिती अगोदर संबधित ठाण्यात कळविणे आवश्यक आहे. वादग्रस्त ठरतील अशा विषयावर कार्यक्रम अगर देखावे / सजावटी सादर करु नयेत.- संपूर्ण उत्सवाचे काळात मंडळाच्या टिकाणी होणा-या कार्यक्रमाची यादी व रुपरेषा पोलिसांना आगाऊ कळवावी.- ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीनुसार करावा तसेच ध्वनिक्षेपकाची मर्यादा २ ओहम व ५००० आर. एम. एस. वॅट पेक्षा जास्त क्षमतेची असू नये.- महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक सकाळी ०६.०० वा. ते रात्रौ १२.०० वा. निश्चित केलेले दिवस खालील प्रमाणे दिनांक ०४/०९/२०२२ पाचवा दिवस (गौरीपूजन), दिनांक ०६/०९/२०२२ सातवा दिवस दिनांक ०८/०९/२०२२ नववा दिवस व दिनांक ०९/०९/२०२२ अनंत चतुर्दशी असे चार दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत.- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियम २००० मधील परिच्छेद ४ चे तरतुदीप्रमाणे रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी १०० मीटरचे परिसरात ध्वनी क्षेपकाचा वापर करू नये.- मुर्तीची व सजावटीची देखभाल करण्याकरीता मंडळाचे कमीत कमी ५ कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक २४ तास मंडपात नेमावेत.- गणेशमुर्तीजवळ लावणेत येणारी समई / निरंजन धक्याने पडून त्याच्या पेटत्या वातीमुळे आगीची दुर्घटना घडणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी.- मंडळाची आरास व करमणूकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी मंडपाच्यासमोर योग्य अंतरावर बॅरीकेट्स किंवा दोर लावुन विभागणी करावी. येणा-या स्त्री पुरुषांसाठी वेगवेगळी रांग लावण्यात यावी. मंडळाजवळ / मिरवणूकीमध्ये हजर असणारे स्वयंसेवक / कायकर्ते यांनी मद्य सेवन करु नये. मद्यसेवन केलेल्या व्यक्तीला मंडळाच्या मंडपा जवळ येण्यास प्रतिबंध करावा. तसेच कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये.- मंडपामध्ये अथवा इतरत्र काही अनोळखी, संशयीत, बेवारस वस्तु उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घडयाळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरतांना रेंगाळतांना दिसल्यास ताबडतोब पोलीसांना कळवावे. सदर बाबत संयोजकांनी स्वयंसेवक/ कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करावे.- देशात होणा-या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळाने मंडप परिसरात सुरक्षित अंतरावर मजबुत बॅरीकेटींग करुन घ्यावे. कोणतेही वाहन मंडपापर्यंत पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. मंडपाच्या सभोवतालच्या १०० मिटर अंतरा मध्ये कुठलेही वाहन पार्क होवू देवू नये. - प्रत्येक मंडळा पुढे “खिसे कापू पासून सावध रहा”, “अफवा पसरवू नका", "स्त्रियांनी आपले दागीने सांभाळावेत", "मुलांना एकटे सोडू नका", " आपले वाहन सुयोग्य ठिकाणी पार्क करा." "वाहनांत मौल्यवान वस्तू ठेवू नका " या बाबतचे सुचना फलक लावावे.- वर्गणी गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांवर, व्यापा-यांवर जोरजबरदस्ती करू नये. मोठ्या रकमेची मागणी करू नये.- गणेश मंडळाच्या मंडपामुळे पोलीसांचे वाहन, अग्निशामक गाड्या, रुग्णवाहिका यांना आणीबाणीच्या प्रसंगी घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येणार नाही याची खबरदारी घ्यावी. महत्वाच्या व गर्दी खेचणा-या गणेश मंडळांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत व त्यांचे रेकॉर्डींग करावे.- मौल्यवान दागिने असणा-या गणेश मुर्तीच्या संरक्षणाची विशेष काळजी संबंधित मंडळांनी घ्यावी.
विसर्जन मिरवणुकी संदर्भात
- गणेश विसर्जनाची मिरवणुक ही वेळेत संपवावी.- मिरवणुकीतील देखावा अगर सजावट टेलिफोन व विदयुत तारांचा अडथळा होईल इतका उंच ठेवू नये.- विसर्जन मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने सुस्थितीत असल्याचा आर.टी.ओ.चा दाखला घ्यावा. वाहनाचा नंबर, चालकाचे नाव, पत्ता संबधीत पोलीस स्टेशनला कळवावा. प्रत्येक वाहनांमध्ये आवश्यकता पडल्यास मंडळाचा स्वतःचा दोर वाहन ओढण्यासाठी ठेवावा.- मिरवणुकीमध्ये बैलगाडी तसेच इतर प्राण्यांचा वापर टाळावा. प्राणी संरक्षण कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.- मिरवणूकीचे वेळी दोन मंडळांमध्ये जास्त अंतर पडू देऊ नये. योग्य अंतर ठेवावे. मंडळाचे वाहनांवर, मंडळाचे नाव, पत्ता, अध्यक्ष, सेक्रेटरी यांची नावे व मोबाईल नंबर असलेला बोर्ड लावावा. तसेच पोलीस स्टेशन कडून देण्यात आलेला परवाना क्रमांक १.५ बाय १.५ फुट बोर्डवर तयार करुन मंडपाच्या व मिरवणूकीतील वाहनाच्या दर्शनी भागावर लावावा.- लहान मुलांना व पोहता न येणा-यांना पाण्याच्या आतमध्ये जाऊ देऊ नये. प्रत्येक मंडळाचे संयोजकांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणीही मद्यसेवन करुन आक्षेपार्ह वर्तन करणार नाही याची खबरदारी घ्यावी. गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणुकी काळात गुलालाचा कमीत कमी वापर करावा. - मिरवणूकीत प्रक्षोभक व चिथावणी देणा-या तसेच जातीवाचक घोषणा देऊ नयेत. मिरवणुकीत कुठलेही धोकादायक खेळ तसेच शस्त्राचे खेळ करु नयेत.- प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन बॉक्स कमानी उभारता येतील. बॉक्स कमानींची उंची २० फुटापेक्षा जास्त नसावी. बॉक्स कमानी गणेश मंडळांच्या १०० फूटाच्या आत असाव्यात. बॉक्स कमानींचा जमिनीपासून १० फूटा पर्यंतचा भाग चेकींगसाठी खुला ठेवावा.