पुणे : डॉलर देण्याच्या अमिषाने ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यापैकी एक बांग्लादेशी आहे. दोघे पश्चिम बंगाल येथील असून, एक दिल्लीतील आहे. नाहीद अमिन रहमान (वय ३६), हफीझुल ऊर्फ यामीन रुपीकुल सरदार (वय २३, रा. गोंधळेनगर, हडपसर, मूळ. रा. पश्चिम बंगाल), ओनिक फकरूल शेख (वय २९, रा. गोंधळेनगर हडपसर, मूळ रा. बांग्लादेश) आणि शाहीद ऊर्फ सौदुल (वय २८, रा. गोंधळेनगर, हडपसर, मूळ. दिल्ली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली असून, तो सध्या जामिनावर आहे.
गणेश पांडुरंग इकारे (वय ३०, रा. कोंढवा) याने याबाबत दत्तवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फसवणुकीची ही घटना ५ ते १० एप्रिल २०१८ या कालावधीत पर्वती पायथा येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. अमेरिकन डॉलर देण्याच्या अमिषाने फिर्यादीकडून ७० हजार रुपये घेतले. डॉलर म्हणून पेपरची रद्दी देऊन फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात चौघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, तसेच अटक केलेल्यांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे. चौघांचे आणखी कोण साथीदार आहेत का, याच्या शोधासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले.