पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात दोन लाख रुपये इतकी किंमत असणारे यार्कशायर टेरियर परदेशी जातीचे कुत्रे चोरणाऱ्या तसेच घरफोडीसह तब्बल पाच गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आरोपीला खडक पोलीसांनी जेरबंद केले आहे.
शुक्रवार पेठेत १मे रोजी दीपक लुटे यांची दुचाकी चोरीला गेली होती. त्याचा तपास सुरु असताना पोलिसांना खबऱ्याकडून आरोपी अक्षय कांबळे याची माहिती समजली. त्यांनी संशयित अक्षय याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामध्ये त्याने शहराच्या मध्य वस्तीत तसेच कात्रज आणि कोथरूड भागातही दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या केल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने यार्कशायर टेरियर हे परदेशी जातीचे कुत्रेही चोरल्याचे सांगितले. त्याने सांगितलेल्या ठिकाणानुसार पोलिसांनी बिबवेवाडीतील अप्पर इंदिरा नगर भागातील घरात लपवलेले कुत्रे ताब्यात घेतले. रोहित विलास निघोट यांचे कोथरूडमधील मयूर कॉलनी भागात नील पेट केअर हे श्वान विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी यॉर्कशायर टेरिअर या जातीचे कुत्रे चोरण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यांना ते कुत्रे परत करण्यात आले होते. या आरोपीकडून कुत्र्यासह, एक हिरो होंडा स्प्लेंडर आणि रोख रक्कम मिळून अडीच लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.