पुणे : खुनाचा प्रयत्न केल्यानंतर मोक्का कारवाई झालेले दोघे सराईत गुंड गेल्या ११ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. पोलिसांनीही तब्बल १ महिना कधी डिलेव्हरी बॉय, कधी गॅरेज मॅकेनिक तर कधी दुधवाला अशा प्रकारे वेषांतर करुन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांना पकडण्यात लोहगाव परिसरात पकडण्यात यश आले.
शुभम दीपक पवळे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, दत्तवाडी) आणि आकाश ऊर्फ स्काय मंगेश सासवडे (वय २२, रा. डुल्या मारतीजवळ, गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना १० दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संबंधीत गुन्ह्यात त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या ५ साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. फरार कालावधीत दोघे परराज्यात देखील वास्तव्यास होते.
तांत्रिक विश्लेषनाद्वारे आरोपींची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष कांबळे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, श्याम सूर्यवंशी, शुभम देसाई,विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शरद वाकसे, संतोष थोरात, सुनिल हासबे, छाया देवकर यांच्या पथकांनी चार वेगवेगळ्या टीम तयार केल्या. त्यानंतर एकाचवेळी चार ठिकाणी छापे टाकून दोघांना पकडले.
मोबाईल वापरत नसतानाही आले जाळ्यात
दोघे आरोपी मोबाईल वापरत नव्हते. त्यामुळे पोलिसांना त्यांना शोधणे अवघड होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी या मित्रांचा पाठलाग करुन त्यांच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी जवळपास १ महिना वेषांतर करुन शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला जात होता. तरीही ते प्रत्यक्ष मिळून येत नव्हते. शेवटी पोलिसांनी चार वेगवेगळी पथके तयार केली. त्यांनी सोमवारी पहाटे एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले. त्यातून त्यांचा ठावठिकाणा मिळाला. तेव्हा पोलिसांनी लोहगावला जाऊन दोघांना अटक केली.