पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहे. गुन्हे शाखेच्या पथकानी वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या जुगार अड्यांवर छापे टाकून ३८ जणांना अटक केली. या कारवाईत जुगार खेळण्याचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली.डेक्कन जिमखाना येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी धाड टाकली होती. शहरातील मध्य भाग, स्वारगेट, दत्तवाडी, वारजे, येरवडा, हडपसर, बंडगार्डन, सहकारनगर परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्यांवर कारवाई करण्यात आली़ त्यात ४८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
बेकायदा गावठी दारु तसेच ताडी विक्री प्रकरणात ७ गुन्हे दाखल करण्यात आले़ या कारवाईत ४६४ लिटर गावठी दारु, १२० लिटर ताडी जप्त करण्यात आली़ ७ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दिली.
कोंढव्यात गुटखासह टेम्पो पकडलाकोंढवा भागातील अजमेरा पार्क परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाकडून तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला यावर कारवाई करण्यात आली. सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप टिळेकर, रमेश चौधर, मयुर सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार टेम्पोतून गुटखा वाहतूक करताना पकडण्यात आले़ त्यात भवरलाल पेमारामजी भाटी (वय २८, रा़ अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) याला पकडण्यात आले.
या कारवाईत टेम्पो तसेच गुटख्याची १२० पोती असा १५ लाख ७२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. स्वारगेट परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.