लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जनआशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २३) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी शिवसेनेचे युवा चिटणीस रोहित कदम (रा. पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी दूरचित्रवाणीवर बातम्या पाहात असताना राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करुन दोन गटात तेढ निर्माण होऊन दंगा होणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या गैरहेतूने चिथावणी देणारे वक्तव्य केलेले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने त्यांचे चाहते, समूह व त्यांचे पक्षातील गट आक्रमक होऊन त्यातून अनुचित प्रकार घडावा, जेणेकरुन महाराष्ट्रातील परिस्थिती अस्थिर करुन त्याचा गैरफायदा घेण्याचे गैरहेतूने जाणिवपूर्वक परिणामांची कल्पना असताना हे वक्तव्य करण्यासाठी नारायण राणे यांनी जाणिवपूर्वक व हेतूपुरस्कर पत्रकार परिषद घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार, राणे यांच्याविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे घेऊन २ पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक चिपळूणला रवाना झाले आहे. यासंबंधी न्यायालयातूनही पोलिसांनी आवश्यक ते वॉरंट घेतले असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रारीवरुन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला आहे.”
-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे