पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणेपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने जळगावमधील वेगवेगळ्या १२ ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.
बीएचआर संबंधित कारवाईसाठी पुणे पोलिसांनी संपूर्ण गुप्तता पाळली होती. या प्रकरणी डेक्कन, पिपंरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे ३ गुन्हे दाखल आहेत. दोन पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक निरीक्षक आणि १०० पोलीस कर्मचारी असा पुणे, पिपंरी आणि ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या पथकाने जळगावमध्ये मागच्या शुक्रवारी सकाळीच जाऊन छापा घातला होता. त्यात जळगावमधील १२ ठिकाणी एकाचवेळी हे छापे घालण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन इतर ठिकाणी तसेच औरंगाबाद येथे झडत्या घेण्यात आला.
सुमारे एक ट्रक भरुन मिळालेल्या या कागदपत्रांची छाननी सध्या सुरु आहे. त्यामध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांचे शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के असे साहित्य आहे. त्यातील कोणते बँकेने केलेली दस्तऐवज आहेत व कोणते आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून करुन घेतलेली कागदपत्रे आहेत, ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. तसेच अटक केलेल्या आरोपीचे जबाब नोंदवून घेण्याचे कारण स्वतंत्र पथक करीत आहेत.या सर्व कागदपत्रांची छाननी करुन त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने आणखी काही दिवस लागणार आहेत.
ठेवीदारांकडून पुणे पोलिसांच्या कारवाईचे स्वागतपुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे बीएचआरचे ठेवीदार, गुंतवणुकदार, ग्राहक यांच्याकडून जोरदार स्वागत केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही यामध्ये न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करीत आहोत. पोलिसांच्या कारवाईने आम्हाला न्याय मिळले, अशी आशा वाटू लागल्याचे ठेवीदार म्हणू लागले आहेत. बीएचआरशी संबंधित अनेक जण आर्थिक गुन्हे शाखेत येऊन पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करीत आहेत.